महाविकास आघाडीच्या बैठकीतली इनसाईड स्टोरी, काय-काय ठरलं?
"महाविकास आघाडीचा विस्तार झाला आहे. आमच्या आघाडीत आज सीपीआय, शेतकरी कामगार पक्ष, आप, जनता दल युनायटेड आणि वंचित बहुजन आघाडी, सपा या सगळ्यांचा समावेश केला आहे. या सगळ्या प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी व्यवस्थित सकारात्मक चर्चा झाली आहे", अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी बैठकीनंतर दिली.
मुंबई | 30 जानेवारी 2024 : महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईच्या ट्रायडेंट हॉटेलमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपाबाबत चर्चा झाली. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे नेते धैर्यवर्धन पुंडकर सहभागी झाले होते. पण त्यांना एक तास बैठकीबाहेर ठेवण्यात आल्याने ते अर्धवट बैठक सोडून निघून आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होतं. महाविकास आघाडीच्या दिवसभराच्या बैठकीनंतर सर्व नेते ट्रायडेंट हॉटेलच्या बाहेर आले. यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. वंचितच्या कोणत्याही नेत्यांचा अपमान झालेला नाही. याउलट ते आमच्यासोबत बैठकीत होते. त्यांनी दुपारचं जेवण आमच्यासोबत केलं आहे. तसेच त्यांना हवं असणारं अधिकृत पत्र आम्ही वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना पाठवलं आहे, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.
“काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन महाविकास आघाडीच्या प्रमुख पक्षांची आज बैठक सकाळी सुरु झाली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशानाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, राष्ट्रवावादी काँग्रेसकडून जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अनिल देशमुख हे प्रमुख नेते उपस्थित होते. शिवसेनेकडून मी, विनायक राऊत उपस्थित होते. आमची आजच्या बैठकीत अतिशय प्रदीर्घ चर्चा झाली आहे. आजच्या बैठकीत बरेचसे निर्णय झाले आहेत. अत्यंत सकारात्मक निर्णय झाले आहेत”, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
‘मविआत किरकोळ मतभेद नाहीत’
“एक प्रमुख निर्णय की, महाविकास आघाडीचा विस्तार झाला आहे. आमच्या आघाडीत आज सीपीआय, शेतकरी कामगार पक्ष, आप, जनता दल युनायटेड आणि वंचित बहुजन आघाडी, सपा या सगळ्यांचा समावेश केला आहे. या सगळ्या प्रमुख पक्षांच्या नेत्यांशी व्यवस्थित सकारात्मक चर्चा झाली आहे. महाविकास आघाडी अधिक मजबुतीने पुढे जात आहे आणि नवे मित्र आम्हाला भेटत आहेत”, असं संजय राऊत यांना सांगितलं. “तीन पक्षांचे प्रमुख नेते इथे उपस्थित आहेत. महाविकास आघाडीत तीव्र सोडून द्या पण किरकोळ मतभेद नाहीत”, असंदेखील राऊत म्हणाले.
राऊत वंचितबद्दल काय म्हणाले?
यावेळी संजय राऊत यांना वंचित बहुजन आघाडीला एक तास बाहेर बसवून अपमान करण्यात आला का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “अजिबात नाही. मला असं वाटतं की काहीतरी गैरसमज आपल्याला झालेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे तीन प्रमुख नेते या बैठकीला आले होते. ते आजच्या बैठकीत आले तेव्हापासून आमच्याबरोबरच चर्चेला बसले होते. त्यांनी आमच्याबरोबर दुपारचं जेवणही केलं आहे. त्यांना महाविकास आघाडीत समाविष्ट करण्याबाबतचं जे पत्र हवं होतं ते देखील आम्ही दिलेलं आहे. दोन तारखेच्या बैठकीला स्वत: प्रकाश आंबेडकर उपस्थित राहणार आहेत”, अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली.