शिंदे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघातच ठाकरे गटाची सरशी; संजय राऊत यांनी मतदारसंघांची नावेच सांगितली
ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका केली आहे. आमची उद्या सभा असल्यामुळेच शाह मुंबईत आले असावेत, असा टोला राऊत यांनी लगावला आहे.
निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी, मुंबई : राज्यातील बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल लागला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. आघाडीसाठी हे महत्त्वाचं यश आहे. विशेष म्हणजे ज्या मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार आहेत. त्याच मतदार संघात ठाकरे गटाची आणि महाविकास आघाडीची सरशी झाली आहे. मतदारांनी शिंदे गटाच्या आमदारांना नाकारलं असल्याचं यातून स्पष्ट होत आहे. संजय राऊत यांनीही ज्या मतदारसंघात शिवसेनेशी गद्दारी केली तिथेच शिवसेना जिंकली आहे. हा जनमताचा कौल आहे, असं संजय राऊत म्हणाले. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी हा दावा केला.
बाजार समितीच्या निवडणुकीत आघाडीला निर्विवाद यश मिळालं आहे. या निकालाने सरकारच्या कंबरड्यात पहिली लाथ मारली आहे. मिंधे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात शिवसेना जिंकली आहे. पारोळा, मालेगाव आणि बुलढाणा या मिंधे गटाच्या आमदारांच्या मतदारसंघात आम्ही जिंकलो आहोत. ही लोकांची मन की बात आहे. ज्या भागात शिवसेनेशी गद्दारी झाली. तिथे शिवसेना आणि महाविकास आघाडीचं पॅनल विजयी झाले. ज्यांनी शिवसेनेवर घाणेरडे आरोप केले तिथे त्यांचा पराभव केला. हा लोकमताचा कौल आहे, असं संजय राऊत म्हणाले.
हिंमत असेल तर निवडणुका घ्या
आमचं सरकारलं आव्हान आहे. हिंमत असेल तर मुंबईसह 14 महापालिकेच्या निवडणुका घ्या. आमची मागणी आहे. तुम्ही निवडणुका घेणार नाही. कारण तुम्हाला भीती वाटते. काल जसे निकाल लागले तसे हे निकाल लागतील. विधानसभा, लोकसभा या प्रत्येक निवडणुकीत महाविकास आघाडीला यश मिळेल असं वातवरण आहे, असं राऊत म्हणाले.
ऐतिहासिक सभा होणार
उद्या महाविकास आघाडीची अतिविराट सभा होणार आहे. त्या सभेतून चित्र स्पष्ट होणार आहे. राज्यात आघाडीच्या प्रमुख सभा झाल्या. आता महाराष्ट्राच्या राजधानीत आघाडीची सभा होत आहे. सभेच्या नियोजनात सर्व प्रमुख पक्ष काम करत आहेत. आदित्य ठाकरे विशेष मेहनत घेत आहेत. काल ते मैदानात होते. बैठका घेतल्या. उद्याची सभा ऐतिहासिक ठरेल. जनमानसाचा निकाल कुणाच्या बाजूने आहे हे उद्या महाराष्ट्राची राजधानी ठरवेल. उद्धव ठाकरेंसह सर्व प्रमुख लोकं या सभेला संबोधित करतील, असं त्यांनी सांगितलं.
शाह यांनी सभेला यावं
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत आले आहेत. त्यावरूनही त्यांनी चिमटे काढले. उद्या आमची सभा होत आहे. ही सभा अतिविराट होणार आहे. त्याची तयारी कशी चाललीय हे पाहण्यासाठी शाह आले असतील. आमची नागपूरला सभा होती. तेव्हा ते खारघरला आले होते. आता उद्या सभा आहे. त्याचा आवाका जोश पाहण्यासाठी गृहमंत्री आले असतील तर त्यांचं स्वागत आहे. जेव्हा आमच्या रॅली होतात तेव्हा गृहमंत्री महाराष्ट्रात येतात. लोकांच्या भावना काय आहेत. आमची ताकद काय आहे हे ते पाहून जातात. त्यांनी यावं. सभेत बसावं. आम्ही त्यांच्यासाठी खुर्ची ठेवू, असे चिमटे त्यांनी काढले.