मुंबई | 13 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गुप्त भेट झाली. एका उद्योगपतीच्या घरी ही भेट झाली. शरद पवार आणि अजित पवार यांची ही दुसरी भेट होती. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात अनेक कयास वर्तवले जात आहेत. या भेटीवरून ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी उलटा सवाल केला आहे. जर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ भेटू शकतात तर शरद पवार आणि अजित पवार का भेटू शकत नाही? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
शरद पवार अजित पवार यांची बैठक झाल्याचं ऐकलं. याबाबत दोन्ही नेत्यांनी भाष्य केलं नाही. नवाज शरीफ आणि मोदी भेटू शकतात तर अजित पवार आणि शरद पवार का भेटू शकत नाही? ही गोष्ट सोडा. मजाक आहे. पण पवार यावर एकदोन दिवसात बोलतील. पवारांनी अजित पवारांना इंडियाच्या बैठकीत हजर राहण्याचं निमंत्रण दिलं असेल. अजून काय होऊ शकतं? असा मिश्किल सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील राजकारणात काहीच गुप्त राहत नाही. पहाटेच्या शपथविधी प्रमाणे परत फिरा, इंडिया आघाडीच्या बैठकीला या असं शरद पवार यांनी अजितदादांना सांगितलं असेल. महाराष्ट्रात काहीही घडू शकतं. राजकारणात उलथापालथ होईल होईल म्हणता. पण त्याची दुसरी बाजूही आहे. ते लवकरच कळेल, असं सूचक विधानही त्यांनी केलं.
यावेळी लोकसभेच्या निवडणुकांवरही त्यांनी भाष्य केलं. वाराणासीतून प्रियंका गांधी उभ्या राहिल्यातर मोदींना जिंकणं कठीण जाईल. यावेळी प्रियंका गांधी वाराणासीतून जिंकतील अशी माझी खात्री आहे. यावेळी वाराणासी, अमेठी आणि रायबरेलीतून वेगळे निकाल लागतील. देशाचं राजकारण पूर्णपणे बदलत आहे. राहुल गांधी यांच्या मागे देश उभा राहील असं दिसतंय. त्यामुळे भाजची चिडचिड सुरू आहे. राहुल गांधी यांना मिळणाऱ्या पाठिंब्यामुळे सुरू आहे, असंही ते म्हणाले.
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने केंद्र सरकारने पोलीस पदकं जाहीर केली आहेत. त्यात महाराष्ट्रातून कुणालाही पदकं मिळालेली नाहीत. त्यावरही त्यांनी टीका केली. पदांवर मी बोलण्यापेक्षा राज्याचे कर्तबगार लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत. कर्तबगार उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आहेत, त्यांनी बोलावं. दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी बोलावं मग आम्ही बोलू. प्रत्येकवेळी केंद्राकडून महाराष्ट्राचा अपमान होत आहे. त्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावं, असं आव्हानच राऊत यांनी दिलं.
पण हे विषय महाराष्ट्राच्या अस्मितेचे आणि स्वाभिमानाचे आहेत. महाराष्ट्रावर अन्याय करणारे आहे. त्यावर तोंड उघडा. आम्ही तोंड उघडलं तर तुम्हाला आवडत नाही. पण आम्ही बोलू. प्रत्येकवेळी महाराष्ट्राला डावललं जात आहे. प्रत्येकवेळी महाराष्ट्राचा अपमान करण्याचं हे धोरण केंद्राने स्वीकारलं आहे, असा आरोप त्यांनी केला.