Sanjay Raut: बाहेरून गुंड प्रवृत्तीचे लोक आणून राज्यात दंगल भडकावण्याचा डाव, संजय राऊतांचा गंभीर आरोप
Sanjay Raut: अल्टिमेटमवर राज्य चालत नाही. यंत्रणा सक्षम आहे. नेतृत्व सक्षम आहे.
मुंबई: राज्याच्या बाहेरून काही गुंडप्रवृत्तीचे लोक आणून राज्यात दंगली भडकावण्याचा डाव आहे, अशी माझी माहिती आहे, असा गंभीर दावा शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केला आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (dilip walse patil) यांची भेट घेतली. तब्बल तास दीड तास त्यांची चर्चा झाली. त्यानंतर संजय राऊत बाहेर आले आणि त्यांनी मीडियाशी संवाद साधला. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर लगेचच राऊत यांनी हा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात तणाव निर्माण होण्याचे संकेतही मिळत आहेत. सध्या सुपाऱ्यांचं राजकारण सुरू आहे. पण या सुपाऱ्या राज्यात चालणार नाहीत, असा इशारा देतानाच राज्यातील पोलीस सक्षम असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
अशा प्रकारचे गुन्हे दाखल होत असतात. आमच्यावरही झालेत. व्यक्ती कितीही मोठी असू द्या, कायद्याचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल होतात. राज्याच्या बाहेरून काही गुंड प्रवृत्तीचे लोक आणायचे आणि राज्यात दंगल भडकावण्याचा डाव आहे. त्यांची ताकद नाही ते लोक हे करत आहेत. हे सुपारीचं राजकारण आहे. या सुपाऱ्या या राज्यात चालणार नाही. मुंबई आणि पोलिस सक्षम आहेत. गृहमंत्री सक्षम आहे. मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. चिंता करण्याची गरज नाही, असं संजय राऊत म्हणाले.
तर तेच एक्सपोज होतील
अल्टिमेटमवर राज्य चालत नाही. यंत्रणा सक्षम आहे. नेतृत्व सक्षम आहे. सरकार सक्षम आहे. राज्य अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असेल तर ती सर्वात मोठी चूक करतील आणि स्वत: एक्सपोज होतील, असा इशाराही राऊत यांनी दिला. मुख्यमंत्र्यांकडे विविध बैठका असतात. शासकीय बैठकात काय होतं, काय नाही हे मी सांगणार नाही. मुंबईचे पोलीस आयुक्त, पोलीस महासंचालक यांची पावलं योग्य दिशेने पडत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अयोध्या दौऱ्याची आखणी सुरू
आदित्य ठाकरे हे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरें सोबत चर्चा झाली आहे. त्यांच्या अयोध्या दौऱ्या संदर्भात आखणी सुरू आहे, अंशी माहितीही त्यांनी दिली.