शिवसेनेसारखं इतर पक्षांना जमलं नाही, त्यामुळेच अनेक राज्यात आज चिता पेटलेल्या : संजय राऊत
पुण्यात शिवसेनेच्या माध्यमातून तीन कोविड सेंटर उभारण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज प्रसारमाध्यमांसोबत बोलताना दिली (Sanjay Raut on Maharashtra and nation corona situation).
मुंबई : पुण्यात शिवसेनेच्या माध्यमातून तीन कोविड सेंटर उभारण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज प्रसारमाध्यमांसोबत बोलताना दिली. युवासेना अध्यक्ष आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या हस्ते या तीन कोविड सेंटरचं उद्घाटन झालं, असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात सरकारला समांतर अशी यंत्रणा राजकीय कार्यकर्ते उभे करत आहेत. म्हणूनच महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती चांगली आहे. याउलट इतर राज्यांमधील पक्षांना ते जमलं नाही. त्यामुळे तिथे आज चिता पेटलेल्या आहेत, असा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला (Sanjay Raut on Maharashtra and nation corona situation).
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
“आम्ही आतासुद्धा आदित्य ठाकरे यांच्यासोबत पुण्यामध्ये तीन कोविड सेंटरचं उद्घाटन केलं. हे सरकारी नाहीत. हे शिवसेनेच्या माध्यमातून उभी केली आहे. महारष्ट्राची स्थिती का चांगली आहे? तर सरकारला समांतर अशी कोविड सेंटर आणि यंत्रणा राजकीय कार्यकर्तेही उभे करत आहेत. त्यामुळे सरकारवरचा भार कमी होतोय. हे इतर राज्यात झालं नाही. अनेक राज्यांमध्ये शिवसेना सारखं इतर पक्षांना काम जमलं नाही. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये आज चिता पेटलेल्या दिसत आहेत. आज कब्रस्तानात जागा नाही, ज्याचे चित्र जगात गेले आहेत, त्याचं कारण तेच आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
‘देवेंद्र फडणवीसांना पंतप्रधान मोदींकडून उत्तर’
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात मृत्यूचे आकडे लपवले जात असल्याचा आरोप केला होता. याबाबत राऊत यांना प्रश्न विचारला असता “देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांना अशाप्रकारचे वक्तव्य करणं हे बहुधा विरोधी पक्षाच्या कार्याचा भाग असेल. त्यांच्या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलेलं आहे”, असा टोला त्यांनी लगावला.
‘महाराष्ट्राने स्वत:ची लढाई स्वत:च्या बळावर लढली’
“महाराष्ट्र पॅटर्न किंवा महाराषट्र मॉडेल हा संदर्भ गेल्या महिन्याभरापासून वारंवार येतोय. याच महाराष्ट्र मॉडेलचा संदर्भ सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. त्याच महाराष्ट्र मॉडेलवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत आहेत. महाराष्ट्र या लढाईत पुढे आहे. महाराष्ट्राने स्वत:ची लढाई स्वत:च्या बळावर निर्माण केली आणि लढली. त्याचं श्रेय नक्कीच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांना द्यावं लागेल”, असं राऊत यावेळी म्हणाले.
‘काँग्रेस आघाडीचा आत्मा, पण त्यांनी मुसंडी मारणं गरजेचं’
“तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालमध्ये मुसंडी मारली. भविष्यात त्यांनी या देशात विरोधीपक्षाची भक्कम आघाडी उभी करावी आणि एक आव्हान उभं करावं, अशी सगळ्यांची इच्छा आहे. या आघाडीचा आत्मा नक्कीच काँग्रेस पक्ष आहे. काँग्रेस पक्षाशिवाय कोणतीही आघाडी होऊ शकणार नाही. काँग्रेस पक्षाला आसाममध्ये चांगलं यश मिळालं आहे. पण सत्तेवर येऊ शकले नाही. केरळ आणि तामिळनाडूत त्यांना थोडंफार यश आलंय. पण काँग्रेसने अजून मुसंडी मारणं जास्त गरजेचं आहे. या देशाला उत्तम आघाडीची गरज आहे. जशी महाराष्ट्रात महाविकास आघाडी काम करत आहे, तशी आघाडी देशपातळीवर असावी. या विषयावर कालच शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. लवकरच याबाबत हालचाली सुरु होतील”, अशी माहिती त्यांनी दिली.
‘महाराष्ट्रात जशी महाविकास आघाडी तशी आघाडी देशात निर्माण व्हावी’
“मी असं कुठे म्हणतोय की आघाडीला नवं नेतृत्व हवं ते, एकत्र बसून निर्णय घ्यायला हवा. प्रत्येकाला वाटतं मीच नेता आहे. तसं होत नाही. आघाडी अशीच निर्माण झाली नाही. जसं महाराष्ट्रात तीन पक्षांनी उद्धव ठाकरे यांना नेता केलं आणि सरकार उत्तम चाललंय. महाविकास आघाडी ही देशातील एक आदर्श आघाडी आहे. तीन भिन्न विचाराचे पक्ष एकत्र आले. त्याचं नेतृत्व आज उद्धव ठाकरे करत आहेत. ही एक आदर्श अशी व्यवस्था आहे. आपण ते निर्माण केलंय. राष्ट्रीय स्तरावर देखील अशी नवनवीन व्यवस्था निर्माण करावी. सगळ्यांनी एकत्र यावं, अशा प्रकारचं मत मी व्यक्त केलं आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले ते बघा व्हिडीओत:
हेही वाचा : मुंबईतील मार्ड डॉक्टरांचे शिष्टमंडळ कृष्णकुंजवर, राज ठाकरे आरोग्यमंत्र्यांसमोर विषय मांडणार