जम्मूत गेल्यावर ‘नो मॅन्स लँड’वर काय घडलं?; संजय राऊत यांनी सांगितला अस्वस्थ करणारा किस्सा
राहुल गांधी चालत आज काश्मीरला पोहोचले. राहुल गांधी यांच्या यात्रेने राजकारणाचे नरेटिव्ह बदलले. काश्मीरचे सत्य समोर आले. हिंदू मुसलमानांना विचार करायला भाग पाडले.
मुंबई: ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेची तोंडभरून स्तुती केली आहे. आदिशंकराचार्यानंतर काश्मीरला चालत जाणारी राहुल गांधी ही दुसरी व्यक्ती आहे, असं सांगतानाच राहुल गांधींच्या भारत जोडोमुळे काश्मीरच्या भूमीवर नवा अध्याय निर्माण झाला आहे. राहुल गांधी माणसं जोडण्याचं काम करत असून त्यांना देशभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील ‘रोखठोक’ सदरातून आपल्या खास शैलीत रोखठोक भाष्य केलं आहे.
संजय राऊत स्वत: जम्मूला गेले होते. भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्यावेळी तिथे काय अनुभव आला याचा अनुभवही संजय राऊत यांनी विशद केला आहे. 21 तारखेच्या संध्याकाळी मी जम्मूला पोहोचलो. तिथे सैनिकांची परेड सुरू होती. उत्साहाचे वातावरण होते. पर्यटकांची गर्दी होती. तिथे नो मॅन्स लँड आहे. त्यावरून पुढे गेलो. तेव्हा तेथील अधिकाऱ्यांनी शेती व जमिनीचे वाटप कसे झाले ते सांगितले.
तिथे सीमेवर एक विशाल पिंपळ वृक्ष आहे. या झाडाची वाटणी झालीय, असं मला सांगितलं. मी विचारलं, कशी? हा इकडला भाग आपला. पलीकडच्या फांद्या त्यांच्या, अधिकाऱ्याने मला सांगितलं.
हे ऐकून अस्वस्थ झालो, असा किस्सा सांगतानाच या गावातल्या गायी, बैल चरायला पाकिस्तानच्या हद्दीत जातात. संध्याकाळी पुन्हा घरी येतात. त्यांच्यासाठी दोन्ही देश सारखेच. माणूसच भांडत बसलाय. राहुल गांधींना ते भांडण मिटवायचं आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलंय.
राजकारणाचे नरेटिव्ह बदलले
राहुल गांधी चालत आज काश्मीरला पोहोचले. राहुल गांधी यांच्या यात्रेने राजकारणाचे नरेटिव्ह बदलले. काश्मीरचे सत्य समोर आले. हिंदू मुसलमानांना विचार करायला भाग पाडले. देशाच्या विषयांवर चर्चा सुरू झाली. देश जोडण्यासाठी मातीवर चालावे लागते. राहुल गांधी चालत आहे, असं राऊत यांनी म्हटलंय.
गर्दीच्या अग्निज्वाळा
19 तारखेला राहुल गांधी 40 किलोमीटर चालले. 20 तारखेला 30 किलोमीटर चालले. रोज 4-5 तास चालायचे. जेथे यात्रा संपेल तिथे कंटेनरमध्ये रात्र घालवून पुढे निघायचे. भारत एकत्र ठेवण्याच्या स्वप्नासाठी ही यात्रा आहे. म्हणून त्यांचे स्वागत व्हायला हवे.
भारत जोडोची चेष्टा आणि हेटाळणी करूनही परिणाम झाला नाही. प्रत्येक गावात आणि शहरात लोक यात्रेत येतच राहिले. काही ठिकाणी लोंढेच उसळले. त्या गर्दीच्या अग्निज्वाला बनतानाचे दृश्य मी पठाणकोटला पाहिले, असंही त्यांनी म्हटलंय.