Raut on Somaiya: इथे धमकी द्यायची, थायलंड-बँकॉकमध्ये पैसे जमा व्हायचे; राऊतांचा सोमय्यांवर नवा आरोप
संजय राऊत म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्यावर सुडापोटी कारवाई करण्यात येत नाही. आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी म्हणून पैसा गोळा केला. चोरी ती चोरीच असते. मग ती पाच हजार कोटींची असो की, एक रुपया आणि चार अण्यांची. चोरीसाठी कायदा तोच आहे. तोच सोमय्यांनाही लागू आहे.
मुंबईः भाजप नेते किरीट सोमय्यांवर सुडापोटी कारवाई केली जात नाही. एका निवृत्त कर्नलने तक्रार केली. हा जनतेचा गोळा केलेला पैसा जमा केला नाही. 58 कोटींचा आकडा समोर आलाय. किती पैसे गोळा केले याचा तपास पोलीस करतील. मात्र, इथे धमकी द्यायची आणि थायलंड-बँकॉकमध्ये पैसे जमा व्हायचे. असा प्रकार या टोळीचा सुरू होता, असा घणाघात मंगळवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. सोमय्यांनी आता पळू नये. त्यांनी कायद्याचा सामना करावा, असे आवाहनही त्यांनी केले. त्यामुळे भाजप विरुद्ध शिवसेना अशा रंगलेल्या सामन्यात पुढे काय होणार याची उत्सुकता लागली आहे. सेव्ह विक्रांत (ins vikrant) मोहिमेचा पैसा बळकावल्या प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे सोमय्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सोमय्या उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. तर, दुसरीकडे किरीट सोमय्या यांचे चिरंजीव नील सोमय्या (Neil Somaiya) यांच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे नील सोमय्या यांना जामीन मिळतो की त्यांचा अर्ज फेटाळला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काय म्हणाले राऊत?
संजय राऊत म्हणाले की, किरीट सोमय्या यांच्यावर सुडापोटी कारवाई करण्यात येत नाही. आयएनएस विक्रांतला वाचवण्यासाठी म्हणून पैसा गोळा केला. हे प्रकरण देशप्रेमाची संबंधित आहे. चोरी ती चोरीच असते. मग ती पाच हजार कोटींची असो की, एक रुपया आणि चार अण्यांची. चोरीसाठी कायदा तोच आहे. तोच सोमय्यांनाही लागू आहे. बाकी वेगळे काही नाही.
कायद्याचा सामना करा
संजय राऊत म्हणाले की, तुम्ही दुसऱ्यांना सल्ला देत होता. पळू नका, कायद्याचा सामना करा. मग तुम्ही कुठे पळताय. प्रकट व्हा. पोलिसांच्या तपासात सहकार्य करा. कायद्याचे पालन करा. त्याला सामोरे जा. आम्ही कधीही कमरेखाली वार करत नाही. कोणाच्या कुटुंबापर्यंत जात नाही. ही कारवाईही सुडापोटी नाही. हा राजकीय आरोप नाही. पोलिस तपासात सारे समोर येईल, असा दावा त्यांनी केला.