निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलं असलं तरी, राज ठाकरे यांनी पत्र लिहिलं असलं तरी कसबापेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक होणार आहे. आम्ही महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढवारच आहोत, असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. मीडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं. तसेच चिंचवडच्या जागेसाठी शिवसेना अजूनही इच्छूक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेलं आवाहन चांगलं आहे. मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न वाखाणण्यासारखे आहे. पण या राज्यात घाणेरडं राजकारण कोणी केलं? येथील वातावरण कोणी गढूळ केलं? महाराष्ट्रात सुडाचं राजकारण कोणी सुरू केलं? यावरही चिंतन व्हायला हवं, असं संजय राऊत म्हणाले.
भाजपने उमेदवार जाहीर केले. काँग्रेसनेही जाहीर केले आहेत. चिंचवडचा निर्णय राष्ट्रवादीने घ्यायचा आहे. चिंचवडसाठी शिवसेना अजूनही इच्छुक आहे. नाही असं नाही. महाविकास आघाडी म्हणून एकत्रित निर्णय घेऊ. दोन्ही मतदारसंघातील वातावरण ज्या प्रकारचं आहे. ते वातावरण सध्याच्या सरकारला अनुकूल नाही. विधान परिषद निवडणुकीने ते दाखवून दिलं. जनतेच्या मनात काय आहे हे स्पष्ट झालंय, असं ते म्हणाले.
निवडणूक बिनविरोध करायची आहे तर भाजप का लढवत आहेत? त्यांनी मागे हटाव. पदवीधर निवडणुकीत जे निकाल लागले त्यामुळे सरकार घाबरले आहे. त्यामुळे निवडणूक टाळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. सरकारला वाटतं ही निवडणूक होऊ नये. निवडणूक झाली तर वेगळा निकाल लागेल. ते सत्य आहे.
दोन्ही मतदारसंघातील निकाल वेगळा लागू शकतो. असं एक जनमानस आम्हाला स्पष्ट दिसतंय. म्हणून या निवडणुका होतील. लोकांची इच्छा आहे. आम्ही सर्व्हे केला. आम्हाला आमच्या भूमिका लोकांना स्पष्ट करायच्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं.
शिक्षक आणि पदवीधरांनी जो निर्णय दिला तोच कसबा आणि चिंचवडला शंभर टक्के लागू शकतो. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं असलं तरी, राज ठाकरे यांनी पत्र लिहिलं असलं तरी निवडणुका होतील. त्यात बदल होणार नाही, असं ते म्हणाले.