शिंदे गटातील आमदारांना ठाकरे गट स्वीकारणार का?; संजय राऊत म्हणाले, त्यांच्याकडे पर्याय…
दीपक केसरकर यांनी आत्मपरीक्षणाची केलेली भाषा हे त्यांच्या गटाचं वैफल्य आणि नैराश्य आहे. एकत्र येऊ असं ते कशासाठी बोलत आहेत? हे वैफल्य आहे, निराशा आहे.
निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येऊ शकतो, असे संकेत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते. त्यामुळे शिंदे गट बॅकफूटवर आला असून शिंदे गटाचं ठाकरे गटात विलिनीकरण होणार असल्याच्या चर्चांना जोर चढला होता. परंतु, या चर्चांमधील हवाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी काढून टाकली आहे. राऊत यांनी या मुद्द्यावरून शिंदे गटाला फटकारले आहे. तसेच शिंगे गटातील आमदारांना ठाकरे गट स्वीकारणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे.
मी वारंवार सांगतो हे सरकार टिकणार नाही. हा गटही टिकणार नाही. यातले अर्ध्यापेक्षा जास्त लोकं भाजपमध्ये स्वत:ला विलीन करून घेतील. कारण त्यांना परत शिवसेना स्वीकारणार नाही. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
आम्हाला आत्मपरीक्षणाची गरज नाही…
आत्मपरीक्षण कोणी करायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच खरी शिवसेना आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना जोमाने वाढत आहे. गद्दार आम्हाला आत्मपरीक्षण करायला सांगत असतील तर कठिण आहे.
या राज्याच्या जनतेनं ठरवलेलं आहे. जे गद्दार आहेत. त्यांना परत विधानसभेत किंवा लोकसभेत पाठवायचं नाही. त्यामुळे आम्हाला आत्मपरीक्षणाची गरज नाही, असं त्यांनी सांगितलं.
तिथे टोळी युद्ध सुरू…
दोन्ही गट एकत्र यावेत असं दीपक केसरकरांना वाटत आहे. त्याअर्थी त्यांनी आत्मपरीक्षण केलं आहे. त्या आत्मपरीक्षणानंतर त्यांचं हे विधान बाहेर येत आहे. म्हणजेच त्यांच्या गटात अजून काही गट निर्माण झाले आहेत. तिथे टोळी युद्ध सुरू आहे.
आमच्याच गटाचे लोक माझा करेक्ट कार्यक्रम करत आहेत, असं काल अब्दुल सत्तार म्हणाले. यावरून तुम्ही काय ते समजून घ्या. त्यांच्या गटात काय घालमेल सुरू आहे, कसे वाद सुरू आहेत, असंही ते म्हणाले.
मंजिल वोही है…
दीपक केसरकर यांनी आत्मपरीक्षणाची केलेली भाषा हे त्यांच्या गटाचं वैफल्य आणि नैराश्य आहे. एकत्र येऊ असं ते कशासाठी बोलत आहेत? हे वैफल्य आहे, निराशा आहे. 16 आमदार अपात्र ठरतील. कायदेशीर दृष्टीने आमची बाजू स्ट्राँग आहे. ठिक आहे न्यायालयात विलंब होतोय. पण मंजिल वोही है. डिस्क्वॉलिफाय होंगे ये लोग, असंही त्यांनी सांगितलं.