मुंबई: कसबा आणि चिंचवड विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी उतरणार की नाही? याबाबतचा अजूनही सस्पेन्स कायम आहे. निवडणूक लढवायची की नाही? यावर ठाकरे गटाने चर्चा केली. मात्र, महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. याबाबत उद्याच निर्णय होणार असल्याचं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे महाविकास आघाडीच्या उद्याच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
अजित पवार, जयंत पाटील आणि सुनील तटकरे काल रात्री मातोश्रीवर आले होते. आम्ही या दोन पोटनिवडणुकीवर काय निर्णय घ्यायचा यावर चर्चा केली. उद्या त्यावर पुन्हा निर्णय घेऊ. निवडणूक लढलीच तर जी चिंचवडची जागा ती शिवसेनेने लढावी असं आमचं मत आहे. लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतरची जागा सेनेने लढावी असं आमचं मत आहे. कसब्याबाबत राष्ट्रवादी निर्णय होईल, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
ही निवडणूक कशा प्रकारे टाळता येईल का यावरही चर्चा झाली. कारण निवडणूक लढवणारे मृत आमदारांच्या घरातील लोकं आहेत. या संदर्भातील बैठकीला उद्धव ठाकरे स्वत: उपस्थित होते. त्यामुळे इतर सहकाऱ्यांशी चर्चा करू आणि निवडणूक लढवावी की नाही यावर निर्णय घेऊ.
निवडणूक लढायला हरकत नाही असा कालच्या बैठकीचा सूर आहे. जरी निवडणुकीतून दूर राहिलो तरी ती निवडणूक होणार आहे. काही प्रमुख अपक्ष निवडणुकीत उतरतील. त्यामुळे निवडणूक होईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
एखादा आमदार मृत पावला तर रिक्त जागेवर उमेदवार देऊ नये ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं होतं. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. महाराष्ट्राची संस्कृती काय आहे. त्याची कशी रोज पायमल्ली होतेय हे कोणी सांगायला नको. पंढरपूर आणि नांदेड पोटनिवडणुकीत ही संस्कृती दिसली नाही. मुंबईत दिसली होती, असा टोला राऊत यांनी लगावला.
महाराष्ट्राची परंपरा आहे. अंधेरीचीही निवडणूक बिनविरोध झाली नाही. निवडणूक झाली. नांदेड, पंढरपूरच्या निवडणुकाही झाल्या. त्यावेळी मृत आमदारांच्या घरातील लोकच निवडणुकीला उभे होते. अंधेरीची निविडणूक अपवाद होता. त्याची कारणं वेगळी आहेत. शिवाय भाजपला जिंकण्याची संधी नव्हती, असंही ते म्हणाले.