Sanjay Raut on Navneet Rana: हनुमान चालिसा वाचायचा तर फडणवीसांच्या घरात जाऊन वाचा; राऊतांचा खोचक टोला
Sanjay Raut on Navneet Rana: आमदार, खासदाराच्या माध्यमातून धार्मिक उद्रेक घडवून राज्य उलथवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मुंबई: हनुमान चालिसा (hanuman chalisa) म्हणायला महाराष्ट्रात विरोध आहे का? देशात कुठेच विरोध नाही. काल ते जेलमध्ये होते. तिथे वाचू शकतात हनुमान चालिसा. त्यांना ऑर्थररोड आणि भायखळा तुरुंगात नेणार आहेत. तिथे जाऊन त्यांनी हनुमान चालिसा वाचावं. त्यांनी फडणवीसांच्या घरात जाऊन वाचावं. एखादं मोठं सभागृह घ्यावं तिथे वाचावं, असा टोला शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी लगावला. महाराष्ट्रात (maharashtra) धार्मिक कार्यक्रमाला कुणीच विरोध केला नाही. पण त्यांचा हट्ट आहे. आम्ही मातोश्रीत घुसून वाचू… घुसून वाचू. मग आम्हीही घुसू. हे काय तुमच्या बापाचं राज्य आहे का? घुसून वाचेल काय? वाचा ना. तुम्ही तुमच्या घरात आणि मंदिरात पठण करा. इतर धर्मीयही करतात. पण तुमचा हट्ट कशासाठी? कुणी तरी खांद्यावर बंदूक ठेवतात आणि बार उडवतात. अर्थात ते बार काही लागत नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली. मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राणा दाम्पत्यासह भाजपवर निशाणा साधला.
आमदार, खासदाराच्या माध्यमातून धार्मिक उद्रेक घडवून राज्य उलथवण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे प्रकरण असेल, सदावर्ते प्रकरण असेल या मागे भाजप आहे. हे खूप मोठं षडयंत्र आहे. पोलिसांनी लावलेली कलमं योग्य आहेत. धर्माच्या नावावर कुणी असं करू नये. लोकप्रतिनिधी एखाद्या पक्षाच्या मदतीने असं करत असेल तर राजद्रोहाचा खटला दाखल होत असतो. भीमा कोरेगाव प्रकरणात अनेक लेखक आणि कवी यांच्यावर हीच कलमे लावण्यात आली. राज्य उलथवण्याची कलमे मागच्या सरकारने लावली. त्यांनी आम्हाला अक्कल शिकवू नये. राज्य अस्थिर करायचं लोकांना भडकवायचं हे चुकीचं आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.
राणा दाम्पत्य म्हणजे टॉलस्टॉय आणि त्यांची बायको नाही
शिवसैनिक प्रतिकार करतात त्यामुळे संघर्ष करायचा आणि दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण करायची. मग राज्यपालांना सांगून राष्ट्रपती राजवटीची शिफारस करायची हे सुरू आहे. त्यांचा प्रत्येक कट उधळून लावला जात आहे. राणा दाम्पत्य म्हणजे टॉलस्टॉय आणि त्यांची बायको नाही ना, असा चिमटाही त्यांनी काढला.
शिवसेना आता अॅक्शन मोडमध्ये
विरोधी पक्ष कायदा व्यवस्था बिघडवण्याचे काम करत आहे. त्यांना लाज वाटायला पाहिजे. आमच्या आंगावर आले तर आम्ही घरात घुसणारचं, असं राऊत म्हणाले. यावेळी त्यांनी भाजप नेत्यांनाही फटकारले. मातोश्रीचे तुम्ही रेकी करता. काही हल्ला वगैरे झाला नाही. तो स्वत:च सर्व करवून घेतो. पोलीस आपले काम करतात. मुंबई पोलीस चुकीचा कारवाई करत नाहीत, असं सांगतानाच शिवसेना आता अॅक्शन मोडमध्ये आहे, अशी प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली.