संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या ‘त्या’ चार सवालातील हवाच काढली; शाह यांना दिला खोचक सल्ला
भाजपचे नेते अमित शाह यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नांदेडच्या रॅलीतून चार सवाल केले होते. शाह यांच्या या चार प्रश्नातील हवाच संजय राऊत यांनी काढून टाकली आहे.
मुंबई : भाजपचे नेते अमित शाह यांनी नांदेडच्या रॅलीतून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना चार सवाल केले होते. उद्धव ठाकरे यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असं आव्हानच अमित शाह यांनी दिलं होतं. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शाह यांच्या सवालातील हवाच काढून टाकली आहे. आम्ही या चारही मुद्द्यावर आधीच भूमिका मांडली आहे. आमची भूमिका जगजाहीर आहे, असं सांगतानाच शिवसेनेवर बोलताना अमित शाह यांनी शिवसेनेच्या इतिहासाचा अभ्यास करावा, असा खोचक सल्लाही संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
तीन तलाकला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. 370 कलमवर आम्ही संसदेत भाजपला जाहीरपणे पाठिंबा दिला आहे. जात आणि धर्माच्या आधारावर आरक्षण असता कामा नये आणि आर्थिक आरक्षणावर आरक्षण असावं ही बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका होती. तीच भूमिका आमची कायम आहे, असं सांगतानाच शिवसेनेवर बोलताना राजकीय इतिहासाचा अभ्यास करूनच बोललं पाहिजे. अयोध्येत आम्हीही होतोच. कोणते प्रश्न तुम्ही विचारत आहात? तुम्ही गोंधळलेले आहात. आमच्यासाठी जे चक्रव्यूह निर्माण केलं, त्यात तुम्हीच अडकलेले आहात. तुमचा अभिमन्यू होताना आम्हाला दिसतोय, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.
प्रत्येक पक्षात बदल होतोच
राष्ट्रवादी काँग्रेसमधील फेरबदलावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राष्ट्रवादी स्वतंत्र पार्टी आहे. शरद पवारांनी त्यांच्या पक्षात काही नव्याने रचना केली. प्रत्येक पक्ष तसं करत असतो. त्यांनी केली असेल तर तो त्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. सर्वच पक्षात असे बदल काळानुसार होतात. पवार हे अनुभवी नेते आहेत. त्यांनी काही निर्णय घेतले असतील तर भविष्याचा वेध घेऊन घेतले असतील. त्या निर्णयाचे जे काही परिणाम होतील, ते सांभाळायला ते समर्थ आहेत, असं त्यांनी सांगितलं.
अजित पवार नाराज नाही
शरद पवार यांनी पक्षात फेरबदल केले आहेत. त्यामुळे अजित पवार नाराज आहेत. याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं असता त्यांनी नाही असं उत्तर दिलं. अजित पवार नाराज आहेत, असं मला वाटत नाही. तुम्ही चुकीचं बोलत आहात. अजित पवार यांचं महाराष्ट्रात स्थान आहे. ते कायम राहील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.