उद्याच्या मोर्चात सरकारमधील लोकांनीही सामील व्हावं; संजय राऊत असं का म्हणाले?
राज्यात अलोकशाही पद्धतीने सरकार बसलं आहे. आम्ही कोणतंही घटनाबाह्य काम करत नाही. अलोकशाही मार्गाने सत्तेवर बसलेलं सरकार लोकशाहीला विरोध करत आहे.
निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: राज्यात आणि देशात आंदोलन करण्यावर बंदी आली असेल तर सरकारने तसं जाहीर करावं. मोर्चांना परवानग्या नाकारून मागच्या नाही, पुढच्या दाराने कुणी आणीबाणी आणत आहे का? हा मोर्चा महाराष्ट्रप्रेमींचा आहे. विरोधी पक्षाचा मोर्चा नाही, असं सांगतानाच हा महाराष्ट्रप्रेमींचा मोर्चा असल्याने उद्याच्या मोर्चात सरकारमधील लोकांनीही सहभागी व्हावं, असं आवाहनच ठाकरे गटाच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं. तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या काळात जसे मोर्चे निघायचे, तसाच उद्याचा मोर्चा असेल, असा दावाही त्यांनी केला. संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते.
उद्याचा मोर्चा विविध मागण्यांसाठी आहे. महाराष्ट्रात महापुरुषांचा अवमान केला जात आहे. संवैधानिक पदावरील व्यक्तीच हा अवमान करत आहे. महाराष्ट्राच्या दैवतांचा अवमान सुरू आहे. दुसऱ्या बाजूला कर्नाटकाचे बोम्मई सीमा प्रश्नावर अजूनही फूरफूत आहेत.
असे अनेक विषय आहेत. महाराष्ट्रातील उद्योग खेचून पळवले जात आहेत. हा महाराष्ट्रावर अन्याय होतोय अन् सरकार गप्प बसलं आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र प्रेमींना मोर्चाला येण्याचं आवाहन केलं आहे, असं संजय राऊत म्हणाले.
जर हे सरकार महाराष्ट्रप्रेमींना मोर्चाची परवानगी नाकारत असेल तर या राज्यात महाराष्ट्रद्रोही सरकार सत्तेवर बसलंय असं म्हणू शकता. खरं म्हणजे आमच्या मोर्चात सरकारमधील लोकांनी सामील व्हावं. हा महाराष्ट्रासाठी मोर्चा आहे. परवानगी नाकारण्याची हिंमत कोणी करेल असं वाटत नाही. कारण त्याचे फार वेगळे परिणाम या महाराष्ट्रात उमटतील, असा इशाराच त्यांनी दिला.
मोर्चा जाहीर झाला आहे. तो मोर्चा होईल. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या काळात अशा प्रकारचे मोर्चे निघाले होते. तशा प्रकारचा हा महाराष्ट्र प्रेमींचा मोर्चा आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
राज्यात अलोकशाही पद्धतीने सरकार बसलं आहे. आम्ही कोणतंही घटनाबाह्य काम करत नाही. अलोकशाही मार्गाने सत्तेवर बसलेलं सरकार लोकशाहीला विरोध करत आहे. आम्ही लोकशाही मार्गाने चाललो आहोत. आणि त्याच मार्गाने जाऊ आणि त्याच मार्गाने तुम्हाला सत्तेवरून खाली खेचू, असा इशाराही त्यांनी दिला.