Jalna lathi charge | दंगलीची पहिली ठिणगी जालन्यातून… संजय राऊत यांचा गंभीर आरोप; हादरवून टाकणारा गौप्यस्फोट काय?
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी खासदार संभाजी राजे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार जालन्याकडे गेले आहेत. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा एवढं हे प्रकरण गंभीर आहे. या सरकारने कपट कारस्थान सुरू केलं आहे. कायदा सुव्यवस्था कुठे आहे?
मुंबई | 2 सप्टेंबर 2023 : आरक्षणासाठी शांततेत आंदोलन करणाऱ्या मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला आहे. त्यामुळे मराठा समाज खवळला आहे. या लाठीचार्जच्या निषेधार्थ आज काही जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला आहे. तर, विरोधकांनी या घटनेचा निषेध नोंदवत थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. हे फडणवीस यांच्या गृहखात्याचे अपयश असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. तर गृहमंत्र्यांच्या सांगण्यावरूनच हा लाठीमार झाला असावा, असं म्हणत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी तर एक मोठं विधान करून भाजपवरच मोठा आरोप केला आहे.
संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. निवडणुकीत विविध मार्गाने दंगली घडवल्या जातील हे मी सांगत होतो. त्याला जालन्यातील लाठीमाराचं प्रकरण प्रमाण आहे. महाराष्ट्रात जाळपोळ झाली. हे सरकारचं अपयश आहे. सरकारला हेच हवं आहे. निवडणुकीआधी राज्यात जातपात, धर्मावर दंगल घडवायची आहे. त्याची पहिली ठिणगी जालन्यातून पडली आहे, असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे. राऊत यांच्या या आरोपाने एकच खळबळ उडाली आहे.
लक्ष विचलित करण्यासाठी लाठीमार
गृहमंत्री कोण आहेत? खातं कुणाकडे आहे? आमच्या सरकारमध्ये आंदोलनं झाली. पण कधी लाठीमार केला नाही. या आंदोलकांवर हल्ला का केला? यामागे राजकीय सूसूत्रता आहे. मुंबईत इंडियाची बैठक सुरू होती. देशातील जनता या इंडियाच्या बैठकीकडे लक्ष देऊन होती. इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची भाषण सुरू होती. सर्व चॅनलवर दाखवलं जात होतं. त्यावरून लक्ष हटवण्यासाठी जालन्यात लाठीमार करून गोंधळ निर्माण केला गेला, असा दावाही राऊत यांनी केला आहे.
शिंदे-फडणवीस यांचं फ्रस्ट्रेशन बाहेर आलं
आतापर्यंत अनेक मोर्चे निघाले. पहिल्यांदाच मोर्चे निघाले नाहीत. मराठा समाजाने शिस्तबद्ध मोर्चे काढले आहेत. त्यांनी कधीच कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन केलं नाही. अशावेळी जाणीवपूर्वक लाठी हल्ला करून तणाव निर्माण केला गेला. इंडिया बैठकीवरून लक्ष दुर्लक्षित करण्यासाठी हा सुनियोजित केलेला हल्ला आहे. हे वैफल्य आहे.
शिंदे- फडणवीस सरकारचं फ्रस्ट्रेशन यातून बाहेर आलं. त्यांची अस्वस्थता बाहेर आली. नाही तर असा हल्ला करण्याचं कारण नव्हतं. त्यात तरुण मुलं, अबालवृद्ध आणि लहानमुले होती. अशावेळी संयम राखता आला असता. पण वातावरण चिघळू दिलं. हल्ला घडवून आणला, असा आरोहही त्यांनी केला.