नवी दिल्लीः कट कारस्थानाच्या छाताडावर पाय ठेवून मुंबई (Mumbai) महापालिका निवडणूक जिंकू, असा थेट इशारा शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला देताना आज सकाळी सकाळीच जोरदार फटकेबाजी केली. मुंबई, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली महानगरपालिका शिवसेना ताकदीने लढेल आणि जिंकेल, असा दावा त्यांनी यावेळी केला. मुंबई महापालिकेच्या तोंडावर शिवसेना, भाजप आणि आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आक्रमक झालीय. एकीकडे भाजपने आमच्या मागे ईडी लावली, असा आरोप शिवसेनेतून स्वतः राऊतांपासून अनेक नेत्यांनी केलाय. तर दुसरीकडे भाजप नेते तुमच्या कारनाम्यामुळे तुम्ही गोत्यात येताय, असा दावा करतायत. ही सारी सुंदोपसुंदी देशातील एका राज्याएवढे मोठे बजेट असणाऱ्या मुंबई महापालिकेसाठी आहे. आता ही पालिका आमच्याविरोधात कट कारस्थाने करणाऱ्यांच्या छाताडावर पाय ठेवून जिंकू, असा दावा राऊत यांनी केलाय. आता भाजपकडून यावर कोण काय उत्तर देणार याची उत्सुकताय.
काय म्हणाले राऊत?
शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, तुम्ही कितीही कारनामे करा. कितीही असंतुष्ट आत्मे एकत्र येऊ द्यात. आम्ही मुंबई महापालिकेवरील भगवा झेंडा खाली उतरू देणार नाही. ही निवडणूक जिंकूच असा इशारा त्यांनी दिला. शिवाय ठाणे, नाशिक, औरंगाबाद, कल्याण डोंबिवली महानगरपालिका ताकदीने लढूल आणि जिंकू असा दावाही त्यांनी केला. कोल्हापूर उत्तरमध्येच कशाला, तर गोव्यात, पाच राज्यांत, पणजी आणि साखळी मतदारसंघात ईडी लावा. मात्र, अनेक गाठीभेटी होत असतात. आमच्याकडे अनेक लोक येतात. अशा भेटींविषयी फार बोलण्याची गरज नाही.
पाटलांनी पुढाकार घ्यावा…
संजय राऊत पुढे म्हणाले की, पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाला असला, तरी ईडी लावणे गरजेचे आहे. गोव्यातले पणजी मतदारसंघ आणि साखळी या दोन्ही मतदारसंघातील मतदारांची ईडी चौकशी लावली तर त्याचेही स्वागत करू. महाराष्ट्रात नंतर बघू. सुरुवात पाच राज्यांतून करावी. चंद्रकांतदादांनी पुढाकार घेतला, तर खांद्याला खांदा लावून काम करू, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
पवारांशिवाय पर्याय नाही
संजय राऊत पुढे म्हणाले की, शरद पवार हे देशातील मोठे नेते आहेत. देशातील विरोधी पक्ष एकत्रित यावेत म्हणून हालचाली ठरत आहेत. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाशिवाय हे काम पुढे जाऊ शकत नाही. शरद पवार यांच्या पुढाकाराशिवाय मोदींना पर्याय नाही. त्यांच्याशिवाय विरोधकांची एकजूट होऊ शकणार नाही, असा दावाही त्यांनी यावेळी केला.