‘अजितदादांना सकाळी, दुपारी जाण्याचा नाद…’, संजय राऊत यांची खोचक टीका
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज 'टीव्ही 9 मराठी'च्या 'लोकसभेचा महासंग्राम' या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.
मुंबई | 1 मार्च 2024 : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’च्या ‘लोकसभेचा महासंग्राम’ या विशेष कार्यक्रमात मुलाखत दिली. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेते अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी भाजपवर टीका केली. “अशोक चव्हाण ताठ कण्याचे आहेत असं म्हटलं होतं. कारण ते जाणार हे माहीत होतं. अजितदादांबद्दलही ताठ कण्याचं म्हणावं लागलं. कारण अजितदादांना जाण्याचा नाद आहे. ते सकाळीही जातात, दुपारीही जातात. अशा नादी छंदी लोकांची का चर्चा करता. सोडून द्या”, अशी टीका संजय राऊतांनी केली. “जो माणूस घाबरलेला आहे. ज्याचे पाय लटपटतात. जो माणूस हिंमतीने उभं राहू शकत नाही. त्यांच्याबद्दल काय अपेक्षा करणार? कुणीही असेल. अजितदादा असं नाही. आमच्या पक्षातही होते असे लोक”, असं संजय राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी केलेल्या दाव्याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊतांनी सविस्तर भूमिका मांडली. “असं काही झालं नाही. तटकरे खोटं बोलत आहेत. आम्ही राष्ट्रवादीच्या बैठकीत जाऊन आम्ही कशाला सांगू. मोदींसोबतच्या बैठकीत काय झालं हे उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितलं आहे. मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीत महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा झाली. मोदींचा कल वाटला की उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत यावं. ज्या पक्षांनी आपल्याला फसवलं, आपला पक्ष संपवण्यासाठी कारस्थान झालं, त्यांच्यासोबत का जायचं अशी आमच्या बैठकीत चर्चा झाली”, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.
‘तटकरेंकडे छाती आहे का?’
“तटकरे काही ब्रह्मदेव आहेत का? तटकरेंकडे छाती आहे का? हिंमतबाज माणसाकडे छाती असते. त्यांच्याकडे कुठे आहे? भाजपसोबत जायची चर्चा झाली. पण जायचं नाही हे ठरलं. उद्धव ठाकरे यांची भाजपसोबत जाण्याची चर्चा होती. ते खोटं बोलतात. त्यांना खोटं बोलण्याचा नाद आहे. ते अंतुलेशी खोटं बोलले. शरद पवारांशी खोटं बोलले. ते मायबापावर विश्वास ठेवत नाही”, अशी टीका संजय राऊत यांनी केली.