Sanjay Raut : पाकिस्तानी टीमचं गुजरातमध्ये ग्रँड वेलकम, संजय राऊत यांचा हल्ला; म्हणाले, ते फक्त गुजरातमध्येच…
कोणत्याही न्यायालयाने महाराष्ट्राच्या विधीमंडळाचे कान उपटले नव्हते. विधीमंडळाला मोठी परंपरा आहे. अनेक महान लोक या खुर्चीवर बसले. त्यांनी संविधान आणि कायद्याचं रक्षण केलं. पण दुर्देवाने एक बेकायदेशीर सरकार राज्यात बसवलं गेलंय.
गणेश थोरात, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 14 ऑक्टोबर 2023 : विश्वचषक सामन्यात भारत विरुद्ध पाकिस्तानचा सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. त्यासाठी पाकिस्तानचा संघ अहमदाबादमध्ये आला. यावेळी पाकिस्तानी संघाचं ग्रँड वेलकम करण्यात आलं. पाकिस्तानी संघावर फुलांची उधळण केली गेली. ढोल ताशे वाजवून त्यांचं पारंपारिक पद्धतीने स्वागत करण्यात आलं. या स्वागत सोहळ्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. हे फक्त गुजरातमध्येच होऊ शकतं. मोदी आणि शाह यांच्या राज्यातच होऊ शकतं, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
गुजरातमध्येच असं होऊ शकतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवाज शरीफ यांच्याकडे जाऊन बर्थडेचा केक कापू शकतात. पाकिस्तानच्या टीमचं भव्य स्वागत होतं हे फक्त गुजरातमध्येच होऊ शकतं. मोदी आणि शाह यांच्या राज्यातच होऊ शकतं. हे इतर कोणत्या राज्यात झालं असतं तर भाजपच्या टोळीने नंगानाच केला असता. एव्हाना आम्हाला देशभक्ती आणि हिंदुत्वाचे धडे शिकवले असते. पण तुम्ही जे करत आहात ते चालतं का? असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला.
मी तुमचा धिक्कार करतो
गुजरातच्या सरकारने हिंदुत्व गुंडाळून ठेवलं आहे. पाकिस्तानच्या संघाचं स्वागत करण्यात आलं. आम्हीच शिवसैनिक, आम्हीच बाळासाहेब ठाकरे यांचे वारसदार असल्याचा दावा करणाऱ्या एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानच्या स्वागतावर एक विधान तरी केलं का? आज बाळासाहेब असते तर यांना जोड्याने मारले असते. आम्हाला लाज वाटते. सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून मोदी स्टेडियम केले. शिंदे बोला. का गप्प आहात? मी तुमचा धिक्कार करतो, असं राऊत म्हणाले.
कंत्राटी सरकार आलं आणि…
सर्वोच्च न्यायालयाने काल आमदार अपात्रतेच्या मुद्दयावरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारलं. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तुम्ही हा पोरखेळ समजत आहात का? असं कोर्टाने म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयाला तुम्ही काय समजता? किती वेळ तुम्ही घेणार आहात? हा पोरखेळ नाही. तुम्हाला वेळचं बंधन पाळावं लागेल. नाही तर आम्ही तुम्हाला आदेश देऊ, असं कोर्टाने म्हटलं आहे.
महाराष्ट्राची न्याय आणि सत्याची परंपरा आहे. संविधानाचं रक्षण करणारे महान लोक यापूर्वी विधानसभा अध्यक्षांच्या खुर्चीत बसलेले होते. पण हे कंत्राटी सरकार आलं, विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे कायद्याला मानत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाला मानत नाहीत. त्यामुळे सरन्यायाधीशांनी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षांना स्पष्ट शब्दात सांगितलं की, तुम्ही आम्हाला सहज घेऊ नका. आम्हीही तुम्हाला आदेश देऊ शकतो, असं राऊत म्हणाले.
विधानसभा अध्यक्षांना जावं लागेल
एक वर्षापर्यंत तुम्ही एक असंवैधानिक सरकारला बसवलं आहे. ते निर्णय घेत आहेत, भ्रष्टाचार करत आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. तुम्ही सरकारला संरक्षण दिलं आहे. या देशात काय चाललंय? विधानसभा अध्यक्ष हे इलेक्शन ट्रॅब्यूनल आहे. निर्णय घेण्याची तुमची जबाबदारी आहे. किती वर्ष लागतात निर्णय घ्यायला. तुमच्याकडे वेळ नाहीये का? तुम्ही आम्हाला कायदा शिकवता. आम्हालाही कायदा आणि संविधान माहीत आहे. तुम्हाला जावं लागेल. विधानसभा अध्यक्षांनाही जावं लागेल, असंही ते म्हणाले.
खुन्याला उत्तेजन द्यावं तसं…
एखाद्या खुन्याला संरक्षण द्यावं, आश्रय द्यावा आणि त्याला खून करण्याचं उत्तेजन द्यावं अशा प्रकारचं काम हे विधानसभा अध्यक्ष करत आहेत. त्यांना कायदा कळत नाही का? सर्वोच्च न्यायालयाने पोरखेळ हा शब्द वापरला आहे. महाराष्ट्राची प्रतिष्ठा धुळीस मिळवण्याचं काम अध्यक्ष, मुख्यमंत्री आणि सरकार करत आहे, अशी टीका त्यांनी केली.