पंतप्रधानपद टिकावं म्हणून नव्या संसदेची उभारणी? ज्योतिषाचा भाजपला सल्ला काय?; संजय राऊत यांचा मोठा गौप्यस्फोट
जुन्या आणि ऐतिहासिक संसद भवनाला विसरता येणं कठिण आहे. निर्दयी आणि भावनाशून्य लोकच या संसदेस टाळे लावू शकतात, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
मुंबई | 24 सप्टेंबर 2023 : देशाच्या नव्या संसद भवनात कामकाज सुरुवात झाली आहे. पहिलंच विशेष अधिवेशन नव्या संसदेत पार पडलं. यावेळी महिला आरक्षण विधेयक मंजूर करण्यात आलं. नव्या संसदेत मंजूर झालेलं हे पहिलं विधेयक होतं. मात्र, या नव्या संसद भवनावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. जुनं संसद भवन मजबूत असताना आणि त्याला काहीच धोका नसताना जुनं संसद भवन उभारण्याची गरज काय? असा सवाल संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील रोखठोक या सदरातून केला आहे. तसेच पंतप्रधान पद टिकावं म्हणूनच ज्योतिषाच्या सल्लानुसार हे संसद भवन उभारल्याचा गौप्यस्फोटही राऊत यांनी अप्रत्यक्षपणे केला आहे.
जुनं संसद भवन अजूनही 50 ते 100 वर्ष टिकून राहू शकते एवढं मजबूत आहे. तरीही नवीन संसद उभारण्यात आल्याने दिल्लीत त्याबाबत दिल्लीत मजेदार चर्चा सुरू आहेत. काही चर्चा मनोरंजक आहेत. दिल्लीचे सरकार हे अंधश्रद्धा आणि अंधभक्तांच्या वर्तुळात फिरत आहे. सरकार चालवणाऱ्यांवर अंधश्रद्धा, ग्रह आणि कुंडलीचा पगडा आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.
चंद्रावर जायचं आणि अंधश्रद्धा…
एका ज्योतिषाने भाजपला सल्ला दिला. त्यानंतर नवं संसद भवन उभं राहिल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. सध्याच्या संसद भवनात दहा वर्षापेक्षा अधिक काळ कोणीही टिकत नाही. त्यामुळे सध्याचे संसद भवन तुम्हाला धार्जिणे नाही. त्यामुळे नव्या संसदेची निर्मिती करा, असा सल्ला ज्योतिषांनी दिला. त्यामुळे घाईघाईत नवे संसद उभारण्यात आले.
शिवाय 2024च्या आधीच हे संसद भवन उभारण्यात आले. नवं संसद भवन गायमुखी असावं असा ज्योतिषाचा आग्रह होता, तोही मानण्यात आला, असा गौप्यस्फोटच राऊत यांनी केला आहे. एकीकडे चंद्रावर जायचं आणि दुसरीकडे अंधश्रद्धेला बळी पडून राज्यकर्ते संसदेची निर्मिती करतात हे देशाला शोभणारं नाही, अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.
बाबाबुवांची छाया
नव्या संसद भवनावर दिल्लीतील ज्योतिषाचार्य आणि बाबाबुवांची चलती आहे. त्यांची छाया या संसदेवर पडली आहे, अशी चर्चा दिल्लीत सुरू आहे. नवं संसद हे भाजपचं प्रचार केंद्रच बनलं आहे. प्रेक्षकगृहातून ज्या पद्धतीने मोदी जिंदाबादचे नारे दिले जात होते, ते यापूर्वी कधीच घडलं नव्हतं. संसदेला एक प्रतिष्ठा होती, ती कायम होती, असा चिमटाही त्यांनी काढला.
लॉबीच तोडली
यावेळी त्यांनी नव्या संसद भवनातील दोषांवरही टीका केली आहे. नव्या संसद भवनात सेंट्रल हॉलच नसल्याचं राऊत म्हणाले. जुन्या संसद भवनात सेंट्रल हॉल होता. तिथे लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य एकत्र येत होते. चहापानी घेत होते. राजकारणापलिकडच्या चर्चा होत होत्या. मतभेद गळून पडत होते. राजकीय विरोधक खेळीमेळीच्या वातावरणात दिसत होते.
परदेशी पाहुणे आल्यावर सेंट्रल हॉलमध्येच अधिवेशन व्हायचं. आता नव्या संसदेत हा संवाद आणि संपर्कच तोडून टाकला आहे. भेटीगाठीवर बंधनं आली आहेत. लोकसभा आणि राज्यसभेतील या लॉबीला महत्त्वाचं आणि ऐतिहासिक स्थान होतं. ही लॉबीच आता तोडून टाकली गेली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.