निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येत आहेत. आज त्यांच्या हस्ते वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवला जाणार आहे. गेल्या 21 दिवसातील मोदी यांचा हा दुसरा मुंबई दौरा आहे. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मोदींचा दौरा होत असल्याने त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. मुंबई महापालिका निवडणुका होईपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिल्लीऐवजी मुंबईत राहू शकतो, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.
जोपर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत नाही. मुंबई महापालिकेची तारीख निश्चित होत नाही, तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुक्काम दिल्लीतून मुंबईतही राहू शकतो. ते मुंबईत घर घेऊ शकतात किंवा राजभवनात मुक्काम करू शकतात. कारण महापालिका जिंकण्यासाठी या मुंबई महाराष्ट्रातील भाजप आणि मिंधे गटाचे लोक समर्थ नाहीत. मोदी आले आणि अख्खा देश लावला तरी महापालिका शिवसेना जिंकेल याची खात्री असल्याने मोदींचा पत्ता सारखा टाकला जातोय, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
मला मोदींवर टीका करायची नाही. दिल्लीत संसद सुरू असताना. महत्त्वाचे विषय असताना, अदानीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी घेरलेलं असताना मोदी मुंबईत येत आहेत. वंदे भारत ट्रेन हे निमित्त आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुंबई महापालिका जिंकायची आहे. हे फार महत्त्वाचं आहे. ठिक आहे. आम्हीही तयारीत आहोत, असा इशाराच राऊत यांनी दिला.
मोदी मुंबईत येऊन गेले. कर्नाटकात गेले. जिथे निवडणुका आहेत तिथे मोदी वारंवार जातात. याचा अर्थ स्थानिक भाजप नेते कमजोर आणि दुर्बल आहेत. देशाचा पंतप्रधान, पण लक्ष कुठे तर मुंबई महापालिकेवर. मोदींचं वारंवार मुंबईत येणं हेच स्पष्ट करतं की इथले सर्व भाजप नेते आणि मिंधे गटाचे नेते आम्हाला आव्हान देण्यात फेल आहेत. ते सक्षम नाही. त्यामुळे ते मोदींना बोलावत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईत येणार आहेत. आज दुपारी मोदी यांच्या हस्ते वंदे भारत ट्रेनला हिरवा कंदील दाखवण्यात येणार आहे. ही ट्रेन मुंबई ते शिर्डी आणि मुंबई ते सोलापूर अशी धावणार आहे. यावेळी मोदी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर अंधेरी मरोळ येथील बोहरा समाजाच्या अरबी अकादमीचंही मोदींच्या हस्ते लोकार्पण पार पडणार आहे.