वन नेशन, वन इलेक्शन कोणत्या षडयंत्राचा भाग?, भाजपचा डाव काय?; संजय राऊत यांचा आजवरचा सर्वात मोठा आरोप
मुख्य कोर्डिनेशन कमिटी आहे. एक रिसर्च कमिटी आहे, जाहिरनामा समिती आहे. प्रचार समिती यावर आम्ही चर्चा करणार आहोत. आमचा वर्किंग ग्रुप आहे. त्यात सर्व पक्षांना सामावून घेणार आहोत. सर्वांना मिळूनच आम्ही देशात निवडणुकांना सामोरे जाणार आहोत.
मुंबई | 1 सप्टेंबर 2023 : देशात वन नेशन वन इलेक्शनचा फॉर्म्युला लागू होण्याची शक्यता आहे. भाजपने त्यासाठीची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने संसदेचं विशेष अधिवेशन बोलावलं आहे. तसेच त्यावर चर्चा करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. त्यामुळे देशात एकाचवेळी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या या मनसुब्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मोठा आणि गंभीर आरोप केला आहे.
केंद्र सरकारने वन नेशन, वन इलेक्शनचा नवा फुगा हवेत सोडला आहे. काय झालं जम्मूत? आधी जम्मूत इलेक्शन घ्या. मणिपूरमध्ये घ्या. वन नेशनच्या आधी फेअर इलेक्शन घ्या. भ्रष्ट इलेक्शन कमिशन बाजूला करा. भ्रष्ट इलेक्शन कमिशन असेपर्यंत देशात वन नेशन वन इलेक्शन होणार नाही, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला. ते मीडियाशी संवाद साधत होते.
निवडणूक पुढे ढकलण्याचं षडयंत्र
वन नेशन वन इलेक्शन वो क्या होता है भाई? हा देश एक आहे ना? वेगळा आहे का? या देशात कोणी वेगळी गोष्ट कशी काय करू शकतो? हा वन नेशनच आहे ना? त्यात काही शंका आहे का? कुणाला शंका आहे? निवडणुकाही एक होतात. वन नेशन वन इलेक्शन ठिक आहे. पण त्या ऐवजी फेअर इलेक्शन घ्या. हा आमचा नारा आहे. वूई वांट फेअर इलेक्शन. ते घेत नाही म्हणून वन नेशन इलेक्शन सुरू केलं आहे. लोकसभा निवडणुका पुढे ढकलण्याचं हे षडयंत्र आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
लक्ष विचलीत करण्यासाठीचे फंडे
भाजपकडे अजेंडाच नाही. कोविंद राष्ट्रपती होते त्यावेळी त्यांच्याकडे लक्ष देत नव्हते. आता त्यांच्याकडे वन नेशन वन इलेक्शनच्या कमिटीची धुरा दिली आहे. भाजपवाले इंडियाला घाबरले आहेत. त्यामुळे ते वेगवेगळे फंडे घेऊन येत आहेत. आमची मिटिंग सुरू आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी या घोषणा होत आहेत, असा दावाही त्यांनी केला.
गणेशोत्सवाविरुद्ध कट
संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याचं कारण काय. तेही गणपती उत्सवात. एरव्ही पंतप्रधान संसदेत येत नाही. आता अधिवेशन का? महाराष्ट्रातील खासदार गणपतीत बिझी असतात. महाराष्ट्रातील खासदार संसदेत पोहोचू नये म्हणून गणपतीत अधिवेशन घेतलं आहे. हा गणेशोत्सवाविरोधात कट आहे. छळ आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला.
संयोजक पदावर वाद नाही
संयोजक पदावर वाद आहेत हे बाहेर तुम्हाला कोणी सांगितलं? बैठक तर आत आहे. आतली चर्चा बाहेर आली कशी? असा सवाल करतानाच काल अनौपचारिक चर्चा होती. आज महत्त्वाची चर्चा होणार आहे. 28 पक्षांची इंडिया आघाडी आहे. यात सर्व पक्षांना सामावून घेणार आहोत. कोणत्याही मुद्द्यावर वाद नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.