‘सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? टेबलावर मारुती स्तोत्र आहे का?’, वाबनकुळे-राऊतांमध्ये झुंपली
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या एका फोटोमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलाय. राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये मकाऊच्या कॅसिनोचा फोटो ट्विट केलाय. या कॅसिनोमधील व्यक्ती हिंदुत्ववादी नेता असल्याचा दावा राऊतांनी केलाय. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर वानकुळे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
मुंबई | 20 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या एका फोटोमुळे राजकीय वातावरण तापलं आहे. त्यांनी एका कॅसिनोमधील फोटो ट्विट केलाय. संबंधित कॅसिनो हे चीनच्या मकाऊ येथील असल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय. तसेच कॅसिनोमध्ये जुगार खेळणारी व्यक्ती एक हिंदुत्ववादी नेते आहेत. या व्यक्तीने साडेतीन कोटी रुपये जुगारात खर्च केल्याचा मोठा दावा संजय राऊतांनी केला. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. फोटोतील व्यक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असल्याचा दावा केला जातोय. भाजपकडून आपल्या अधिकृत ट्विवर अकाउंटवर राऊतांच्या ट्विटवर स्पष्टीकरण देण्यात आलंय. “आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधी जुगार खेळलेले नाहीत”, असं स्पष्टीकरण भाजपकडून देण्यात आलंय.
भाजपकडून अधिकृतपणे ट्विट करुन माहिती देण्यात आल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत स्पष्टीकरण दिलंय. “मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे”, असं स्पष्टीकरण चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विटमध्ये दिलंय. त्यांच्या या प्रतिक्रियेवर देखील संजय राऊतांनी ट्विटरवर निशाणा साधला.
‘फॅमिली चिनी आहे का?’
“ते म्हणे, फॅमिलसह मकाऊला गेले आहेत. जाऊद्या. त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे, कधीच जुगार खेळले नाहीत. मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय”, अशा शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला.
‘माझ्याकडे 27 फोटो आणि 5 व्हिडीओ’
दरम्यान, संजय राऊतांनी त्यानंतर प्रसारमाध्यमांनादेखील प्रतिक्रिया दिली. “फोटोतली व्यक्ती आहेत, त्यांनी सांगावं की, तो मी नव्हेच. किंवा त्यांच्या पक्षाने ते व्यक्ती नाहीत हे सांगावं. तेलगीने एका बारमध्ये 1 कोटी रुपये उडवल्याचं मला माहिती होतं. तेलगीने एका रात्रीत 1 कोटी रुपये उडवले. पण मकाऊमध्ये महाराष्ट्रातला एक माणूस जाऊन साडेतीन कोटी रुपये उडवतो, म्हणजे हे अच्छे दिन आ गए. रात्री बारा वाजता रेस्टॉरंटला जातात? साडेतीन कोटीचे पॉईंट्स विकत घेतात, तीन टप्प्यात, ते आरामात तिथे बसतात”, असं संजय राऊत म्हणाले.
“बसू दे. मी कुणाच्याही व्यक्तीगत आनंदावर विरझण घालू इच्छित नाही. पण महाराष्ट्रात काय चाललंय? सामाजिक वातावरण काय? नुसते आरोप-प्रत्यारोप करुन चालणार नाही. आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे आधी द्या. माझ्याकडे 27 फोटो आणि 5 व्हिडीओ आहेत. पण आमच्यात थोडी माणुसकी आहे म्हणून थोडी गंमत आहे. ते 27 फोटो आणि व्हिडीओ टाकले तर भाजपला दुकान बंद करावं लागेल. पण मी ते करणार नाही. ते दुकान 2024 पर्यंत चाललं पाहिजे”, अशी भूमिका संजय राऊतांनी मांडली.