सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तोंड शिवून बसले; संजय राऊत यांचा हल्लाबोल
उदयनराजे भोसले यांचे अश्रू आम्ही पाहिले. ते महाराजांचे वंशज आहेत. उदयनराजेंचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू आहे. महाराजांचा अपमान करण्यापेक्षा मरण का नाही आलं?
निखिल चव्हाण, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई: शिवप्रताप दिनाच्या निमित्ताने प्रतापगडावर नेत्रदिपक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याने त्यावरून राज्यात तीव्र पडसाद उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतापगडावर शिवप्रताप दिनाचा सोहळा होत आहे. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे. सरकार वाचवण्यासाठीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चुप्पी साधली आहे. त्यामुळेच त्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला नाही, असा घणाघाती हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना हा हल्लाबोल केला. शिवप्रताप गडावरील जल्लोष जो आहे तो जल्लोष महाराष्ट्रात नेहमी होतो. महाराजांच्या कोणत्याही महत्त्वाच्या दिवशी हा जल्लोष होतो. शिवप्रताप दिनाचं महत्त्व समजून घ्या. महाराजांच्या अपमानानंतर आपण राज्यापालांचा धिक्कार केला असता किंवा राज्यपालांना परत पाठवण्याची मागणी केली असती तर आजच्या शिवप्रताप दिनाचं महत्त्व अधिक वाढलं असतं, असं संजय राऊत म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही. राज्यपालांच्या विधानानंतरही शिंदे चुप्पी साधून आहेत. ही त्यांची हतबलता आहे. विफलता आहे. सरकार वाचवण्यासाठीचं ढोंग आहे. महाराष्ट्राचा आणि शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल आजही राजभवनात आहेत आणि मुख्यमंत्री तोंड शिवून बसले आहेत, अशी टीका त्यांनी केली.
भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्याने शिवाजी महाराजांचा अवमान केला. ते त्यांच्या जागी बसले. तुम्ही त्यांचं समर्थन करत आहात. अशा मुख्यमंत्र्यांना गडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा अधिकार आहे का? या राज्याची जनता हा सवाल करत आहे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
उदयनराजे भोसले यांचे अश्रू आम्ही पाहिले. ते महाराजांचे वंशज आहेत. उदयनराजेंचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू आहे. महाराजांचा अपमान करण्यापेक्षा मरण का नाही आलं?, ही प्रत्येक मराठी माणसांच्या मनातही भावना आहे. उदयनराजेंनी महाराष्ट्राची भावना व्यक्त केली. पण मुख्यमंत्री आणि सरकार एका हतबलतेने पाहतंय आणि परत शिवप्रताप दिन साजरा करतंय, हे ढोंग आहे, असा घणाघात त्यांनी चढवला.
मला 1 तारखेला कोर्टात उपस्थित राहण्याचं बेळगावचं समन्स आहे. आम्ही वकील पाठवला आहे. त्यानंतर जी पुढची तारीख असेल त्या तारखेला मी जाईल. आता जाणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
सीमावादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. सुनावणी झाली तर होईल. आम्ही सर्वच वाट पाहतोय. कर्नाटकाचे मुख्यमंत्री दिल्लीत ठाण मांडून बसले आहेत. आपले मुख्यमंत्री कुठे आहेत? असा सवाल त्यांनी केला.