शिंदे सरकारचं महाराष्ट्रप्रेम खोक्याखाली चिरडलंय; मोर्चा निघण्यापूर्वीच संजय राऊत यांचा हल्लाबोल
ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील मोर्चे पाहिले आहेत. ती पिढी अजूनही आहे. त्यांना या मोर्चाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हाचे मोर्चे महाराष्ट्र प्रेमाने भारावलेले होते.
मुंबई: महापुरुषांच्या अवमानाविरोधात महाविकास आघाडीने आज विराट मोर्चाचं आयोजन केलं आहे. थोड्याच वेळात हा मोर्चा भायखळा येथून निघणार आहे. या मोर्चात तब्बल दोन लाख लोक सहभागी होणार असून संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील मोर्चांची आठवण व्हावी असा हा मोर्चा असणार आहे. खुद्द ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही त्याचं सुतोवाच केलं आहे. त्यामुळे या मोर्चाकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. या मोर्चाला निघण्यापूर्वी संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीत महाराष्ट्र सरकारचा समाचार घेतला. शिंदे सरकारचं महाराष्ट्रप्रेम खोक्याखाली चिरडलं गेलं आहे. त्यामुळेच ते महापुरुषांचा अवमान सहन करत आहेत, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे.
आजच्या मोर्चातून घणाघात तर बसेलच. पण घणाघात होणार आहे या कल्पनेने सरकारचे पाय लटपटू लागले आहेत. मोर्चाला परवानगी देण्यासाठी टाळाटाळ केली गेली. 13 अटी शर्ती लादल्या. महापुरुषांचा अवमान सातत्याने होत आहे. त्याविरोधात हा मोर्चा आहे, असं संजय राऊत म्हणाले.
हा महाराष्ट्रप्रेमींचा मोर्चा आहे. तुम्ही त्याला अटी घालता? हे बोलू नका. ते बोलू नका सांगता. हे करू नका. ते करू नका सांगता. आता भाषणही तुम्हीच लिहून द्या. जसं मुख्यमंत्र्यांना भाषण लिहून देता तसं विरोधी पक्षाला लिहून द्या. काय बोलायचं आणि काय बोलायचं नाही. हे अटीत आहे. पण आमचा कुणी आमचा आवाज दाबू शकणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
सरकारमध्ये कोणी महाराष्ट्रप्रेमी असतील तर त्यांनी मोर्चात सामील व्हावं. त्यांचं महाराष्ट्रप्रेम खोक्यात दबलं गेलं. चिरडलं गेलंय, अशी टीका करतानाच आजचा मोर्चा प्रचंड आणि अतिविराट असाच निघेल, असं त्यांनी सांगितलं.
ज्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील मोर्चे पाहिले आहेत. ती पिढी अजूनही आहे. त्यांना या मोर्चाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही. तेव्हाचे मोर्चे महाराष्ट्र प्रेमाने भारावलेले होते आणि आताही तसाच मोर्चा असेल. हा मोर्चा महाराष्ट्र प्रेमींचा मोर्चा आहे, असं त्यांनी सांगितलं.
तुम्ही लाचार आहात. मिंधे आहात म्हणून तुम्ही महापुरुषांचा अपमान सहन करत आहात. तुम्ही फक्त खोकी मोजत बसा. आम्ही अपमानाविरोधात लढत आहोत, असंही ते म्हणाले.