मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद पाचपाखाडी, वागळे इस्टेट पुरतीच; संजय राऊत असं का म्हणाले?
या महाराष्ट्रात महाराजांबाबत असं बेताल वक्तव्य कुणी केलं नव्हतं आतापर्यंत. झालंय काय तुमच्या मुख्यमंत्र्यांना? प्रश्नविचारा त्यांना.
मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आज बंद पुकारण्यात आला आहे. या बंदवर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. बंद कसला करताय? कशासाठी करताय? तुमच्यात जर महाराष्ट्र प्रेमाचा अंश शिल्लक असेल तर ठाण्याती बंद मागे घ्या, असं आवाहन करतानाच मुख्यमंत्र्यांची ताकद फक्त पाचपाखाडी आणि वागळे इस्टेट पुरतीच मर्यादित आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना केली.
खरं तर शिवरायांचा अवमान या प्रश्नावर महाराष्ट्र बंद करायला हवा होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान, महात्मा फुल्यांचा अपमान झाला. त्याविरोधात बंद पुकारणार होतो. पण आम्ही तो बंद पुढे ढकलला. सध्या आम्ही मोर्चात आहोत.
मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे, त्यांच्यात जर महाराष्ट्र प्रेमाचा अंश शिल्लक असेल तर त्यांनी ठाणे बंद मागे घ्यावा. कारण त्यांची ताकद तेवढीच आहे. पाचपाखाडी आणि वागळे इस्टेट बंद करण्या इतपतच त्यांची ताकद आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
ठाणे कशा करता बंद आहे? मुख्यमंत्री ज्या ठाण्यातून येतात ते ठाणे बंद? कशा करता पण? मुख्यमंत्री त्यांचं शहर स्वत: बंद करतात. हा वेगळाच प्रकार पाहतो. मुख्यमंत्रीच त्यांचं शहर बंद करण्याचा आदेश देतात आणि गृहमंत्री पाहत राहतात, असा टोला त्यांनी लगावला.
विरोधकांकडे काही काम नाहीये, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. मी कालच म्हणालो यांच्या डोक्यात गांडूळाचा मेंदू आहे. नुसता वळवळत असतो. हे बंद ते बंद.
अरे तुम्ही राज्यकर्ते आहात. तुम्ही सत्ताधारी आहात. विचारांचा प्रतिवाद विचाराने करा. उत्तर द्या. कुठला तरी वारकरी संप्रदायातील एक गट पकडायचा आणि आमच्या विरोधात सोडून द्यायचा. हे किती काळ चालणार? असं करू नका, अशा शब्दात त्यांनी सत्ताधाऱ्यांना फटाकरलं.
जरी तुमचं राज्य घटनाबाह्य असलं, बेकायदेशीर असलं तरी तुम्ही सत्तेवर आहात. सत्तेवर असल्याचं भान ठेवा. प्रगल्भता दाखवा. आपण आता प्रौढ झालो आहोत हे दाखवा. हे राज्य खूप मोठं आहे. कसले बंद करताय ठाणे वगैरे? असा संताप त्यांनी व्यक्त केला.
मग बंद कशासाठी केला? शिवरायांच्या अवमानाविरोधात मोर्चा काढणं हा काम नसण्याचा प्रकार सांगणं म्हणजे हा महाराष्ट्राचा मोठा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांना काय बोलतात याचं भान आहे का?, असा सवालही त्यांनी विचारला.
छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करणारा राज्यपाल राजभवनात बसलाय. छत्रपती शिवाजी महाराज, बाबासाहेब आंबडेकारांचा अवमान करणारा मंत्री तुमच्या बाजूला बसला. एक दिल्लीत बसला अन् तुम्ही म्हणताय आम्हाला काम नाही? यांचा मेंदू आहे कुठे? परवा दिल्लीत मेंदू गहाण ठेवून आलात का? शिवाजी महाराजांच्या अवमानाविरोधात आवाज उठवणे याचा अर्थ काम नाही? असा संतापही त्यांनी व्यक्त केला.
या महाराष्ट्रात महाराजांबाबत असं बेताल वक्तव्य कुणी केलं नव्हतं आतापर्यंत. झालंय काय तुमच्या मुख्यमंत्र्यांना? प्रश्नविचारा त्यांना. आम्हाला काम आहे आणि अभिमान आहे म्हणून महाराष्ट्र प्रेमाचं काम हाती घेतलं आहे. तुम्ही लाचार आहात. मिंधे आहात म्हणून तुम्ही महाराष्ट्र अपमान सहन करत आहात. तुम्ही खोकी मोजत बसा. आम्ही अपमानाविरोधात लढत आहोत, असा टोलाही त्यांनी लगावला.