गृहमंत्र्यांच्या भाषणानंतर 24 तासात शशिकांत वारिसे यांची हत्या, याचा अर्थ काय?; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
विरोधकांना संपवण्यासाठी ईडी, सीबीआय, पोलीस आणि आयकरच्या कारवाईत अडकवलं जात होतं. आता पुढचं पाऊल टाकलं गेलं आहे. आता विरोधकांच्या हत्या घडवून आणल्या जात आहे.
मुंबई: राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंगणेवाडीत सभा घेतली. त्यात रिफायनरीच्या विरोधकांना धमक्या दिल्या. रिफायनरी प्रकल्प करून दाखवतो. कोण आडवा येतो ते पाहू अशी भाषा गृहमंत्र्यांनी वापरली. दुसऱ्याच दिवशी पत्रकार शशिकांत वारिसेंची हत्या झाली. 24 तास आधी गृहमंत्री म्हणतात रिफायनरीला कोण आडवा येतो ते पाहू. दुसऱ्या दिवशी रिफायनरीला आडवा येणारा पत्रकार मारला जातो. याचे काय संबंध लावायचे? हा योगायोग समजायचा का? की अजून काय समजायचे? असा सवाल ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राजापूरचे शशिकांत वारिसे यांना गाडीखाली चिरडून मारलं. जो पत्रकार रिफायनरी विरुद्ध लढत होता. रिफायनरीमुळे कोकणचं कसं नुकसान होईल. शेतीचं नुकसान होईल, प्रदूषण वाढेल असे अनेक प्रश्न घेऊन ते आवाज उठवत होते. रिफायनरी येणार म्हणून ज्यांनी भविष्यात चढ्या भावाने विकण्यासाठी जमिनी विकत घेतल्या त्यांची माहिती द्यायला वारिसे यांनी सुरुवात केली होती.
रिफायनरी समर्थक आणि सरकार पक्षाचे लोकं आणि रत्नागिरीचे राजकारणी यांचे जमिनी घेण्यात कसं साटेलोटं आहे, राजापुरात अब्जावधीचे कसे व्यवहार झाले. त्याबाबत वारिसे यांनी यांनी लिहायला सुरुवात केली होती. त्यामुळे त्या भागातील राजकारण्यांच्या डोळ्यात ते खूपत होते, असं संजय राऊत म्हणाले.
काहींनी सुपारी घेतली
कोकणात काही राजकीय पालकमंत्री आहेत. ज्यांनी कोकणात रिफायनरी आणण्याची सुपारी घेतली आहे. त्यात केंद्रीय मंत्री आहेत. त्यांचे चिरंजीवही आहेत. त्यांनीही रिफायनरी आणणारच असं म्हटलं आहे, असंही राऊत म्हणाले. तसेच वारिसेंची हत्या हा सरकारने केलेला खून आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
सूत्रधाराला अटक करा
विरोधकांना संपवण्यासाठी ईडी, सीबीआय, पोलीस आणि आयकरच्या कारवाईत अडकवलं जात होतं. आता पुढचं पाऊल टाकलं गेलं आहे. आता विरोधकांच्या हत्या घडवून आणल्या जात आहे. ही झुंडशाही आहे. ही गुंडशाही आहे. आतापर्यंत अटकेत असलेल्या आरोपीने किती हल्ले केले आणि कुणाच्या सांगण्यावरून केल्या हे गृहमंत्र्यांना माहीत आहे. हत्येमागच्या सूत्रधाराला अटक केली पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.
बलिदान वाया जाऊ देणार नाही
सरकार बदलताच कोकणात हत्येचं सत्र सुरू झालं आहे. या प्रकरणावर उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. आम्ही हा विषय गांभीर्याने घेतला आहे. मी पत्र लिहिलं. मुख्यमंत्र्यांना विरोधी नेत्यांना भेटायला वेळ नाही. ते वेगळ्या कामात आहेत. आम्ही त्यांना वारंवार वेळ मागतो. वारिसेचं रक्त, बलिदान वाया जाऊ देणार नाही, असंही ते म्हणाले.