तुमचा प्रयोग फसला ही एका ओळीची गोष्ट… संजय राऊत यांनी फडणवीस यांचा विषयच संपवला

| Updated on: Jun 29, 2023 | 10:54 AM

प्रश्न चीनचा आहे आणि दम देत आहेत पाकिस्तानला. राहुल गांधी मणिपूरला जात असतील आणि त्यातून काही निष्पन्न होत असेल तर आम्ही त्याचं स्वागत करतो.  राहुल गांधी सर्व पक्षीय शिष्टमंडळ घेऊन गेले तर आम्ही त्याचं स्वागत करू.

तुमचा प्रयोग फसला ही एका ओळीची गोष्ट... संजय राऊत यांनी फडणवीस यांचा विषयच संपवला
sanjay raut
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : भाजप आणि राष्ट्रवादीची युती होणार होती. आमचं सरकार स्थापन होणार होतं. त्यासाठी शरद पवार यांनीही पुढाकार घेतला होता. पण नंतर शरद पवार यांनी डबल गेम केला. त्यामुळे आम्हाला पहाटेचा शपथविधी घ्यावा लागला, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. फडणवीस यांच्या या आरोपाची हवाच खासदार संजय राऊत यांनी काढून घेतली आहे. काय झालं, काय नाही हे महत्त्वाचं नाही. तुमचा प्रयोग फसला ही एका ओळीची गोष्ट आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांना शरद पवार यांनी पूर्ण पाठिंबा दिला हेच सत्य आहे, असं रोखठोक प्रतिपादन संजय राऊत यांनी केलं. ते मीडियाशी संवाद साधत होते.

संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पहाटेच्या शपथविधीच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. फडणवीस यांच्याकडे कोणताही नवीन मुद्दा नाही. त्यांचं सरकार औटघटकेचं आहे. सुप्रीम कोर्टाने निर्णय घेण्यालसाठी दिलेल्या मुदतीचा अर्धा काळ गेला आहे. हे सरकार पडतंय. त्यामुळे फडणवीस झोपेत बडबडत असतील किंवा जागेपणी बडबडत असतील. त्याकडे फार लक्ष देऊ नका. शरद पवारांनी काही गोष्टी केल्या असतील तर ठिक आहे. त्यात नवीन काय? काय केलं पवार साहेबांनी? तुम्ही प्रयोग केला तुमचा प्रयोग फसला. ही एका ओळीची गोष्ट आहे. तुमचा प्रयोग तुमच्या अंगलट आला. लोकांनी तुमच्याकडे गांभीर्याने पाहिलं नाही, असा हल्लाच संजय राऊत यांनी चढवला.

हे सुद्धा वाचा

हेच सत्य आहे

डबल गेमची गोष्ट सोडा. उद्धव ठकारे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मदतीने सरकार बनवलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी सरकार चालवलं. शरद पवार यांनी पूर्ण पाठिंबा दिला. हेच सत्य आहे, असंही संजय राऊत यांनी फडणवीस यांना सुनावलं.

सर्वच क्षेत्रात समान नागरी कायदा असावा

यावेळी त्यांनी समना नागरी कायद्याच्या मुद्द्यावरूनही भाजपला फटकारलं. निवडणुका आल्या आहेत. लोकसभा असेल किंवा विधानसभा असतील कोणताही मुद्दा सरकारकडे नाही. त्यामुळे एखाद्या विषयावर हिंदू -मुस्लिमानात तणाव करून निवडणुका जिंकता येईल का? मतांचं विभाजन करता येईल का? याबाबत चर्चा होत आहे. समान नागरी कायदा फक्त धार्मिक क्षेत्रात नको. आर्थिक, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातही हा कायदा असला पाहिजे, असंही ते म्हणाले.

सरकार पळून गेलंय

मणिपूरमधील हिंसेवरूनही त्यांनी भाजप सरकारला फटकारलं. देशातील एका राज्याशी संवाद तुटणं याचा अर्थ त्या राज्यात अराजक निर्माण होणं आहे. मणिपूरमध्ये लिबिया, सीरियासारखी परिस्थिती सुरू झाली आहे., असं एका माजी लष्करी अधिकाऱ्यानं म्हटलं आहे. मणिपूरमध्ये कायद्याचं राज्य नाही. रस्त्यावर हिंसाचार सुरू आहे. पोलीस आणि लष्कर काही करू शकत नाही. सरकार पळून गेलं आहे. सरकारनंच पलायन केलं याला अराजक म्हणतात. अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी जाऊन राज्य शांत करणं गरजेचं आहे, असं त्यांनी सांगितलं.

जा चीनमध्ये घुसा

जी माहिती येते त्यानुसार मणिपूर अस्थिर करण्यामागे चीनचा हात असल्याचं स्पष्ट झालं आहे. चीन आत घुसला असेल. लोकांना शस्त्र पुरवत असेल तर ती गंभीर गोष्ट आहे. पण देशाचे संरक्षण मंत्री जम्मूला जातात आणि पाकिस्तानला दम देतात. पाकिस्तानमध्ये घुसण्याची भाषा करतात. स्वागत आहे. पण तिकडे सर्व शांत आहे. पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री कशात काही नसताना पाकिस्तानला दम देत आहेत. चीनला डोळे वटारून दाखवा. कारण मणिपूरमध्ये चीनचा हस्तक्षेप आहे. जा ना चीनमध्ये घुसा. पण त्याबाबत पंतप्रधान, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री बोलत नाहीत, असा हल्ला त्यांनी चढवला.