मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे संजय राऊत यांनी देखील राज्यपालांवर टीका केलीय. राज्यपालांच्या वक्तव्यावरुन संजय राऊतांनी भाजप आणि मनसेला देखील टार्गेट केलं. “काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानाविरोधात जोडो मारो आंदोलन करणाऱ्या भाजप आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी तेच जोडे जमा करुन ते राजभवनात गेले पाहिजेत”, असं विधान संजय राऊत यांनी केलं.
“राज्यपालांना महाराष्ट्रापासून काय झालंय ते मला माहिती नाही. महाराष्ट्राच्या राज्यपालांना काय झालंय? कधी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल अभद्र वक्तव्य, तर कधी काय, त्यांनी आज तर छत्रपती शिवाजी महाराज यांना जुने नेते असं म्हटलंय. त्यांनी असं वक्तव्य करुन शिवाजी महाराज आणि संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान केलाय”, असा आरोप संजय राऊत यांनी केला.
“राहुल गांधींनी वीर सावकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप, मनसे सारखे पक्ष तीव्र आंदोलन करत आहेत. जोडे मारत आहेत. आता हे जोडे जमा करा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दलचं वक्तव्य राजभवानावरुन होत आहे, आता तिथे जोडे गेले पाहिजे, तेव्हा तुम्ही महाराष्ट्राचे सपूत आहात. नाहीतर हे ढोंग आहे”, असा टोला त्यांनी भाजप आणि मनसेला लगावला.
“शिवाजी महाराजांचे आदर्श हे चिरंतर आहेत. ते जुने पुराने कसे होऊ शकतात? याआधी सावित्रीबाई फुले यांच्याविषयी असंच वक्तव्य केलं. शिवाजी महाराजांविषयी वारंवार असे वक्तव्य त्यांच्याकडून केले जात आहेत”, असं संजय राऊत म्हणाले.
“राहुल गांधी यांनी वीर सावकर यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्यामुळे भाजप, मनसे सारखे पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. या सगळ्यांनी राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात रस्त्यावर उतरुन आपला मराठी बाणा, महाराष्ट्राचा मराठी बाणा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल असणारी निष्ठा दाखवून द्यायला पाहिजे. आम्हाला काय करायचं ते आम्ही लवकरच करु”, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
भगतसिंह कोश्यारी नेमकं काय म्हणाले?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात पदवीदान समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी बोलत होते. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि भाजप नेते नितीन गडकरी यांना गौरवण्यात आलं. यावेळी भाषण करताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नितीन गडकरी यांची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी केली.
“आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो. तेव्हा आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मला आता असं वाटतं तुम्हाला कोणी विचारलं तुमचा आयकॉन कोण? तुमचा आवडता नेता कोण? तर तुम्हाला बाहेर जायची गरज नाही. महाराष्ट्रातच तुम्हाला भेटून जातील. शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे. इथेच मिळतील. डॉ. आंबेडकरांपासून ते डॉ. नितीन गडकरींपर्यंत तुम्हाला सर्व इथेच मिळून जातील”, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलं.