‘एनआयए’कडेच तपास दिल्याने हिरेन मृत्यूप्रकरणाचं सत्यबाहेर येणार नाही; राऊतांनी विरोधकांना फटकारले
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा एनआयएद्वारे तपास करण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी फटकारले आहे. (sanjay raut slams opposition leader over mansukh hiren death case)
मुंबई: मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणाचा एनआयएद्वारे तपास करण्याची मागणी करणाऱ्या विरोधकांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी फटकारले आहे. हिरेन मृत्यूप्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्याची विरोधक मागणी करत आहेत. एनआयएकडे तपास दिल्यानेच या प्रकरणाचं सत्यबाहेर येणार नाही, असं सांगतानाच मुंबई पोलीस हा तपास करण्यात सक्षम आहे. आता तर गृहमंत्र्यांनी एटीएसकडे या प्रकरणाचा तपास दिला आहे, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. (sanjay raut slams opposition leader over mansukh hiren death case)
मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणावर शिवसेनेकडून पहिल्यांदाच प्रतिक्रिया आली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विरोधकांनी हिरेन मृत्यूप्रकरणी काही मुद्दे उपस्थित केले असतील तर त्याचा तपास व्हायला हवा. विरोधकांनी मुद्देसुद माहिती दिली तर त्याचा तपास व्हायलाच हवा. नक्कीच व्हावा. ही घटना दुर्देवी आहे. हिरेन यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली याबाबत जनतेच्या मनात शंका आहे. ही शंका दूर झाली पाहिजे. पण त्यांच्या मृत्यूचं कुणीही भांडवल करू नये, असा टोला राऊत यांनी लगावला.
सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवणं योग्य नाही
हिरेन यांचा मृत्यू का झाला? कोणत्या कारणाने झाला? त्याला कोण जबाबदार आहेत? या सर्व प्रश्नांशी संबंधित सत्य लवकरात लवकर बाहेर यायला हवं. जेवढ्या लवकर सत्य बाहेर येईल तेवढं सरकारच्या प्रतिष्ठा आणि प्रतिमेसाठी योग्य ठरेल. राज्याचं अधिवेशन सुरू असतानाच एका महत्त्वाच्या प्रकरणातील साक्षीदाराचा संशायस्पदपणे मृत्यू होणे हे नक्कीच धक्कादायक आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे विरोधकांनी लगेचच सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात ठेवणं योग्य नाही, असं सांगतानाच हिरेन यांच्या कुटुंबीयांचा आक्रोश व्यथित करणारा आहे. हे नक्की काय आहे? हे बाहेर यायलाच हवं, असंही ते म्हणाले.
वाझेंवर बोलण्यास टाळले
यावेळी राऊत यांना सचिन वाझेंवर विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांबाबत विचारण्यात आलं. त्यावर राऊत यांनी बोलण्यास नकार दिला. वाझेंचं मला माहीत नाही. मला असं वाटतं एखाद्या अधिकाऱ्यावर बोलणं योग्य वाटत नाही, असं सांगत राऊत यांनी या विषयाला बगल दिली.
काय आहे प्रकरण?
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानीच्या अँटेलिया बंगल्याजवळ 25 फेब्रुवारीला संशयित स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीनच्या कांड्या आढळल्यानं एकच खळबळ उडाली होती. मुकेश अंबानींच्या बंगल्याजवळ जिलेटिनच्या स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आल्याने तपास यंत्रणा अलर्ट झाली होती. अंबानी यांच्या घरासमोर जी स्कॉर्पिओ सापडली होती, तिच्या मालकाचा मृतदेह मुंब्र्यातल्या खाडीत सापडला आहे. मनसुख हिरेन असं गाडीमालकाचं नाव आहे. गाडीचा शोध लागल्यानंतर मनसुख हिरेन हे मुंबई पोलीसांसमोर हजरही झाले होते. गाडी चोरीला गेल्याचं त्यावेळेस त्यांनी पत्रकारांना सांगितलं होतं. क्राईम ब्रँचनं त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर आज मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा गुंता आणखी वाढला आहे. मनसुख हिरेन यांचा खून केला गेला की आत्महत्या की आणखी काही कारण आहे याचा तपास अजून सुरु आहे. (sanjay raut slams opposition leader over mansukh hiren death case)
VIDEO : Mansukh Hiren Death | मनसुख हिरेन प्रकरणी पत्नीची पहिली प्रतिक्रिया#MansukhHiren #Thane #MansukhHirenWife pic.twitter.com/1lu5Zi2O7N
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 5, 2021
संबंधित बातम्या:
ठाणे पोलिसांचा भाग नसलेले सचिन वाझे पोस्टमार्टमच्या ठिकाणी कसे?; आशिष शेलारांचा सवाल
शिवसेनेत प्रवेश केलेल्या सचिन वाझेंकडे सर्वच महत्त्वाच्या केसेस कशा?; मनसेचा सवाल
(sanjay raut slams opposition leader over mansukh hiren death case)