पोपट येतात आणि उडून जातात; संजय राऊत यांची राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका

| Updated on: Apr 26, 2023 | 12:39 PM

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज राज ठाकरे, अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. पत्रकार परिषद घेऊन राऊत यांनी जोरदार टीका केली.

पोपट येतात आणि उडून जातात; संजय राऊत यांची राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता टीका
sanjay raut
Image Credit source: ani
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रत्नागिरीत सभा होणार आहे. ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी या सभेला अत्यंत खोचक भाषेत टीका करताना राज ठाकरे यांना पोपट संबोधले आहे. कोकणात सभा घेऊ द्या. असे पोपट येतात आणि उडून जातात. पोपट पोपट असतो, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. महाडमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे, असंही राऊत म्हणाले. संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावरही टीका केली.

बारसू रिफायनरी प्रकल्प हा काय कोकणातील पहिला प्रकल्प आहे काय? रायगडमध्ये अनेक प्रकल्प आहेत. अनेक उद्योगपतींचे आहेत. कुणी विरोध केले का? चिपळूणलाही आहे. कोणी विरोध केला? केलाय का विरोध? विरोध झाला तो फक्त स्टरलाईटला. नव्वदच्या दशकात विरोध झाला. युतीच्या काळात अजून एका एनर्जी प्रकल्पाला विरोध झाला होता. आता नाणारच्या प्रकल्पाला. केंद्रीय मंत्री कोकणातले आहेत. त्यांनी सिंधुदुर्गात किती उद्योग आणले? किती प्रकल्प आणले? आणले ते असे विषारी प्रकल्प, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.

हे सुद्धा वाचा

सक्षम गृहमंत्र्यांची गरज

यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर एका प्रश्नाला उत्तर देताना टीका केली. शाह गृहमंत्री कमी आणि भाजपचे नेते जास्त आहेत. या देशाला उत्तम गृहमंत्र्याची गरज आहे. महाराष्ट्रालाही सक्षम गृहमंत्र्याची गरज आहे. निष्पक्षपाती गृहमंत्र्यांची गरज आहे. नुसते पाठी सरदार पटेल यांचे फोटो लावून चालत नाही, असा चिमटा त्यांनी काढला.

धूर येत आहे

मी सुट्टीवर गेलो नाही. डबल ड्युटीवर आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. त्यावरही राऊत यांनी टीका केली. त्या भागातून धूर येत आहे सारखा. दरेगावातून धूर येत आहे. एका वृत्तपत्रात वाचलं. मला माहीत नाही. काय जळतंय आतमध्ये. कारण पेपरमध्ये बातम्या आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

फडणवीस खोटे बोलत आहेत

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातच आम्ही लढू असं फडणवीस म्हणाले होते. फडणवीस यांच्या या विधानाची संजय राऊत यांनी खिल्ली उडवली. फडणवीस खोटं बोलत आहेत. त्यांच्या अंतरंगात काय आम्हाला माहीत आहे. फडणवीस अपमान सहन करून उपमुख्यमंत्री झाले आहेत. ते बोलतात एक. पण त्यांच्या अंतरंगात वेदना आहे. त्यांच्या जवळच्या लोकांना माहीत आहे. आम्ही त्यांच्या जवळचे आहोत. त्यांचं अंतरंग धकधकतंय नुसतं, अशी जहरी टीका त्यांनी केली.