Special Report : राज ठाकरे VS संजय राऊत, राजकीय टीका थेट जॉनी लिव्हर आणि कादर खान यांच्यापर्यंत
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गटप्रमुखांच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंपासून काँग्रेस नेते राहुल गांधींचीही नक्कल केली. त्यानंतर राज ठाकरेंवर पलटवार करताना टीका, जॉनी लिव्हर आणि कादर खानपर्यंत पोहोचली.
मुंबई : गटप्रमुखांच्या मेळाव्यातून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निशाण्यावर पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी आले. मुख्यमंत्री असताना फिरत नव्हते, आणि आता फिरायला लागले, अशी टीका करतानाच राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंची नक्कल केली. त्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊतांनी राज ठाकरेंना उत्तर दिलंय. नक्कल पाहायचीच झाली तर जॉनी लिव्हरची पाहू, असं म्हणत राऊतांनीही खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला.
कोरोनाचा काळ आणि नंतर मानेच्या शस्त्रक्रियेमुळं मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे फिरत नव्हते. पण सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे बाहेर पडायला लागले, त्यावरुनच राज ठाकरेंनी टीकास्त्र सोडलंय. पण उद्धव ठाकरे बरे झालेत याचं दुख: आहे का ? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांनी केलाय.
उद्धव ठाकरेंची नक्कल केल्यानंतर राज ठाकरेंनी, आपला मोर्चा काँग्रेसचे नेते राहुल गांधींकडे वळवला. राहुल गांधींचा उल्लेख म्हैसूर सँडल सोप करतानाच, राज ठाकरेंनी राहुल गांधींचीही नक्कल केली.
दरम्यान, राज ठाकरेंचं भाषण म्हटलं की, कोणाची ना कोणाची नक्कल आलीच. पण आता नकलेवरुन सुरु झालेली टीका, जॉनी लिव्हर आणि कादर खानपर्यंत आलीय.