मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हायकमांड दिल्लीत आहेत. मुख्यमंत्रीही दिल्लीत हेलपाटे मारत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या काय जबाबदारी आहेत माहीत नाही. पूर्वी ते आमच्यासोबत असताना उत्तम विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर मुख्यमंत्री झाले. आता उपमुख्यमंत्री झाले. काल पाहिलं ते फुटलेल्या गटाची गाडी चालवत होते, त्यांच्यावर केंद्राने काय काय जबाबदाऱ्या टाकल्या आहेत, हे पाहावं लागेल, असा चिमटा काढतानाच फडणवीस हा फार चांगला माणूस आहे. मला त्यांची दया येते. कीव येते. त्यांना देवाने लवकरच या संकटातून सोडवावे ही प्रार्थना करतो, असा टोलाही ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. ते मीडियाशी बोलत होते.
अर्बन नक्षलवाद वाढत असल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यावरही संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. तेच मुख्यमंत्री असताना भीमा कोरेगावची दंगल उसळली. तेव्हाही हाच अर्बन नक्षलवादाचा आरोप केला होता. तरीही तुम्ही अजून अर्बन नक्षलवाद मोडून काढू शकला नाही. हे तुमचं अपयश आहे. अर्बन नक्षलवाद हा तुमच्या सरकारविरोधातील बंड आहे, असं संजय राऊत म्हणाले.
तुम्ही रोजगार दिला नाही. तुमचं सरकार शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारावर काम करण्यास अपयशी ठरलं आहे. त्यामुळे अशा प्रवृत्ती वाढत आहेत. नक्षलवादाचा विचार समजून घ्या. तेलतुंबडे प्रकरणात कोर्टाने काय सांगितलं? वरवरा राव प्रकरणात काय सांगितलं? याचा विचार तुम्ही केला पाहिजे. खोट्या प्रकरणात तुम्ही लोकांना अडकवून त्यांना दहशतवादी आणि आर्थिक दहशतवादी ठरवत आहात, अशी टीकाही त्यांनी केली.
शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी भाजपकडून सापत्न वागणूक मिळत असल्याचा आरोप केला होता. त्यावर राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कीर्तिकर हे आमचे जुने सहकारी आहेत. त्यांनी जे सांगितलं ते सत्य आहे. आमची भाजपशी युती होती, तेव्हा ते आम्हाला अशीच वागणूक देत होते. दिलेला शब्द पाळत नव्हते. केंद्रापासून ते राज्यापर्यंतची आश्वासने हवेत लटकत होती. आमच्या प्रमुख नेत्यांचा अपमान केला जात होता. तसेच शिवसेनेला खतम करण्याचा डाव भाजपने आखला होता. त्यामुळेच आम्ही सावध झालो. आम्ही भाजपची साथ सोडली. ती भाजपविरोधातील चिड होती, असं संजय राऊत म्हणाले.