मुंबई: शिवसेनेला पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत असून संजय राऊत यांनी तर कोटही शिवून ठेवला आहे, अशी टीका भाजप नेते आशिष शेलार यांनी केली होती. शेलार यांच्या या टीकेवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी पलटवार केला आहे. आम्ही स्वप्न पाहतो. महाराष्ट्रात पाहिलंच आहे. 2024नंतर तुम्ही पाहालचं. त्यानंतर तुम्हाला तुमचे कोटही भांडीवालीला द्यावे लागतील, अशा शब्दात संजय राऊत यांनी शेलारांवर पलटवार केला.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी त्यांनी शेलारांवरही घणाघाती टीका केली. मी कधीच कोट शिवत नाही. कोट तुमचेच लटकून पडले आहेत. आम्ही महाराष्ट्राबाहेर एक लोकसभा जिंकली त्याचा आनंद आहे. तुमचं केंद्र सरकार आणि गुजरातचं मंत्रिमंडळ तिथे होतं. तरीही आम्ही जिंकलो याचा आनंद आहे. स्वप्न काय तुम्हालाच पाहता येतात का? आम्हीही स्वप्न पाहण्याची क्षमता राखून ठेवतो. महाराष्ट्रात काय झालं ते तुम्ही पाहिलंच आहे. 2024मध्येही पाहालच. तुमचे कोट भांडीवालीला द्यावी लागेल, असं सांगतानाच महाराष्ट्राच्याबाहेर आमचं पहिलं पाऊल आहे. आमचा खासदारांचा आकडा चांगला आहे. हा आकडा वाढेल. आमचं महत्त्व वाढेल. भाजपच्या पोटात का दुखतं? महाराष्ट्राच्याबाहेर आम्ही विस्तार करणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.
पाडव्याला सरकार जाणार असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे. त्यावरही त्यांनी टीकेची झोड उठवली. त्यांना काय दावा करायचा तो करू द्या. आता नवीन तारीख पडलीय.1 जानेवारी. बरं. मी ही तारीख कॅलेंडरवर लिहून ठेवली आहे. त्यावर फुलीही मारून ठेवली आहे. यापूर्वीही अशाच तारखा पडल्या होत्या, असा चिमटाही त्यांनी काढला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अभिनेता शाहरुख खानला पत्रं लिहिलं होतं. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. शाहरुख खान अभिनेता असला तरी तो एका मुलाचा बाप आहे. त्यालाही त्याच्या मुलाची चिंता आहे. त्यामुळे अशा बापाला देशाच्या एका नेत्याने पत्रं लिहून संवेदना व्यक्त केली तर वाईट काय? राजकारण्यांनाही संवेदना आणि मन असतं. ही चांगली गोष्ट आहे. राहुल गांधी यांनी एका वडिलांना लिहिलेलं ते पत्रं आहे. आर्यनवरील आरोप खरे की खोटे माहीत नाही. तो तुरुंगातून बाहेर येईल की नाही हे माहीत नाही. त्यावर जर एखादं पत्रं लिहिलं तर चुकीचं काय?, असं ही ते म्हणाले.
तुम्ही राज्यातील पिक्चरचा एंड कधी करणार? असा सवाल त्यांनी करण्यात आला. त्यावर नवाब मलिक इंटरव्हल करत नाहीत. पूर्वीच्या काळात काही थिएटर होते. मराठा मंदिर, मिनर्व्हा तिथे शंभर शंभर आठवडे सिनेमा चालायचा. हा सिनेमा काही आठवडा चालत असेल, लोकं पाहतात आणि स्विकारतात तोपर्यंत सिनेमा चालेल, असंही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी परमबीर सिंग यांच्या प्रतिज्ञापत्रावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. ढोल वाजवणाऱ्या भाजप नेत्यांचं तोंड फुटणार हे आम्ही आधीच सांगितलं होतं. अनिल देशमुख त्यातून सुटतील. बेकायदेशीरपणे त्यांना जेलमध्ये टाकले आहे. 2024 पर्यंत थांबा. त्याचा हिशोब सांगा, असं ते म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत राहणे ही रोज दिवाळी असायची. बाळासाहेब मोठ्या मनाचे होते. त्यांना महाराष्ट्राची काळजी होती. ते होते तेव्हा रोजच फटाके फोडत होते. दिवाळीला त्यांना भेटायचो. आज बाळासाहेब असते तर आजची राजकीय परिस्थिती उद्धभावली नसती, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
एक निवडणूक काय जिंकली, शिवसेना पंतप्रधानपदाची स्वप्नं पाहू लागलीय; आशिष शेलारांचा टोला
‘फक्त घोषणा आणि भाषणं करुन शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत’, रक्षा खडसे यांची ठाकरे सरकारवर टीका
‘ते रोज लवंग्या फोडतात, आम्ही बॉम्ब फोडणार’, प्रसाद लाड यांचा ठाकरे सरकारला इशारा
(sanjay raut taunt ashish shelar over dadra nagar haveli by-election result)