मुंबई: लोकशाहीच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी केलेल्या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. उत्तर प्रदेशात गेल्या तीन महिन्यात 17 खून आणि बलात्कार झाले आहेत. हुकूमशाही काय आहे. कायदा सुव्यवस्था कोसळणं हे आपण पाहिलं पाहिजे. जिग्नेश मेवाणींना (jignesh mewani) अटक करण्यात आली आहे. मेवाणी यांनी मोदींविरोधात ट्विट केलं म्हणून त्यांना अटक केली. अटक करून अटक केली. हे कोणतं लक्षण आहे? हे कोणत्या लोकशाहीचं लक्षण आहे? त्यावरही फडणवीसांनी मनमोकळं केलं पाहिजे. फडणवीसांच्या भावना समजून घेऊ शकतो. कारण त्यांना जी लोकशाहीची उबळ आली आहे राष्ट्राच्या हिताची आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
संजय राऊत मीडियाशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. फडणवीसांची भूमिका ही लोकशाहीवादी आहे. महाराष्ट्रातील जे भाजप नेते आहेत, त्यांचं नेतृत्व नरेंद्र मोदी करत आहेत. अशा पक्षाचे लोकं लोकशाहीविषयी प्रवचनं झोडत आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. फडणवीसांचं कौतुकही आहे. शरद पवारांनी काल चांगलं वक्तव्य केलंय. सरकार येऊ शकलं नाही म्हणून हे सर्व चालू आहे, असं पवारांनी सांगितलं. सरकार यावं ही प्रबळ इच्छा होती. उबळ होती. जी अस्वस्थता आहे. त्यातून विरोधी पक्षाच्या लाऊडस्पीकरमधून अशा प्रकारची वक्तव्ये बाहेर पडतात, असा टोला राऊत यांनी लगावला.
केंद्रीय तपास यंत्रणांचा कसा वापर केला जातो. न्यायालयावर कसा दबाव आणला जातो अनेक राज्यात विरोधी पक्ष कसा दबावाखाली आहे यासह मानवी हक्कासंदर्भात जागतिक पातळीवर चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे ते कोणत्या हिटलरशाही विषयी बोलतात हे समजून घ्यावं लागेल. राज्याचे विरोधी पक्षनेत्यांना लोकशाहीची चिंता आहे तर त्यांच्याशी चर्चा करू. त्यांची भूमिका फक्त महाराष्ट्रापुरती नसून देशाची आहे. संपूर्ण देशात हुकुमशाही निर्माण झाली आहे का अशी चिंता अनेकांनी व्यक्त केली आहे. त्याचा परिणाम त्यांच्यावर झाला असेल. आम्ही बोलू त्यांच्याशी, असं सांगतानाच राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांना जे ओळखतात त्यांना कळेल हे लोकशाहीवादी सरकार आहे, असं ते म्हणाले.
विरोधकांवर हल्ले म्हणजे काय? कोणी माथेफिरू वेडा स्वत:वर हल्ला झाला म्हणून ओठाखाली टोमॅटो सॉस लावून फिरत असेल, टोमॅटो सॉस लावून राष्ट्रपती राजवट लावा असे म्हणत असेल तर अशा मुर्खपणाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे, असा टोलाही त्यांनी किरीट सोमय्या यांना नाव न घेता लगावला.
ते सत्तेत येऊ शकले नाही. पुढचे 25 वर्ष येऊ शकत नाहीत. त्यातून अशांतता निर्माण झाली आहे. त्यांचं मन अशांत झालं आहे. त्यावर एकच उपाय आहे. त्यांनी घरामध्ये, देवघरात हनुमान चालिसा वाचावा आणि मन शांत करावं. या देशात लोकशाहीवर हल्ला करत असेल. विरोधकांवर हल्ला करत असेल तर जशास तसे उत्तर दिलं पाहिजे. चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना चुकीची माहिती दिली असेल तर वेगळी माहिती त्यांना देईल. देशभरात विरोधकांवर हल्ला होतोय. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर होत आहे. त्यावर भाजपच्या नेत्यांनी पुढाकार घ्यावा, असा चिमटाही त्यांनी काढला.