मुंबई: आमदार लांब राहतात त्यांना मतदानाबाबत काही सूचना द्यायच्या असतात. विधान परिषद आणि राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) मतदानाची प्रक्रिया खूप तांत्रिक असते. वेगळ्या प्रकारचं मतदान असतं. त्यामुळे आमदारांना सूचना द्यायच्या असतात म्हणून आमदारांना एकत्रं ठेवलं जातं. भाजपनेही (bjp) ठेवलेलं आहे. काँग्रेस ठेवते. राष्ट्रवादीने (ncp) ठेवलेलं आहे. त्यामुळे प्रश्नचिन्हं निर्माण करावं असं काय आहे? असं सांगतानाच तुम्ही केलेलं चालतं. तुमचं ते गेटटुगेदर आणि आम्ही आमदारांना बाजू घेऊन गेलो. मूर्ख लोकं आहेत, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली. ते मीडियाशी संवाद साधत होते. शिवसेनेच्या आमदारांना मुंबईत हॉटेलात ठेवण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपकडून शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राऊत बोलत होते. यावेळी त्यांनी क्रॉस मतदान होणार नसल्याचं सांगतानाच शिवसेनेचा उमेदवार निवडून येणार असल्याचं स्पष्ट केलं.
आमदारांवर विश्वास नसल्यानेच शिवसेनेने त्यांना हॉटेलात ठेवल्याचा आरोप अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी केला होता. याबाबत राऊत यांना विचारण्यात आलं. त्यावर असं कोण म्हणतंय? असा सवाल राऊत यांनी केला. त्यावर रवी राणा यांनी म्हटल्याचं त्यांना सांगताच, सकाळी सकाळी कुणाचं नाव घेताय तुम्ही?, असा सवाल करत त्यांनी अधिक भाष्य करणं टाळलं.
शिवसेना आमदारात धुसफूस आहे का? असा सवाल केला असता, हा प्रश्न मीडियासमोर चर्चा करण्याचा नाही. शिवसेनेच्या दोन्ही जागा निवडून येतील. आघाडीच्या चारही जागा निवडून येतील. कोण काय बोलतंय, कोण काय टोमणे मारतंय, कोण काय पिना मारतंय यात जाऊ नका. 10 तारखेला संध्याकाळी 8 वाजता निकाल स्पष्ट झालेला असेल, असं ते म्हणाले. क्रॉस व्होटिंगचा प्रश्नच नाही. मत दाखवावंच लागतं. खुलं मतदान आहे. इलेक्शन एजंट किंवा चीफ व्हीपला मतदान दाखवावं लागतं. कदाचित हा नियम अपक्षांना लागू होत नसेल. आघाडीचे सर्व आमदार ठाम आहेत. आमच्यासोबत आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
यावेळी त्यांनी नुपूर शर्मा प्रकरणावर भाष्य केलं. प्रथमच या देशाला माफी मागावी लागते. जगाने तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. एका मोठ्या देशाला लहान देशासमोर माफी मागावी लागत आहे. या पूर्वी कुणी अशी हिंमत केली नव्हती. भाजपने विषारी विचार पेरलेतत. त्यातून त्यांचं त्यांच्या लोकांवर नियंत्रण सुटलं आहे. धर्माधर्मात तेढ निर्माण करण्याचा राजकारण करत आहे. तो संपूर्ण प्रकार भाजपच्या अंगलट आला असला तरी देशाची बदनामी झाली आहे, असं ते म्हणाले.
औरंगाबादच्या नामांतरावरून त्यांनी मनसेला चांगलेच फटकारले. मनसेने त्या संदर्भात त्यांचे माताश्री, पिताश्री भाजपात आहेत त्यांना हा प्रश्न विचारावा. केंद्रात त्यांचं सरकार आहे. राज्यातून प्रस्ताव गेला आहे, असं ते म्हणाले.