मुंबई: भोंग्यांबाबत कोर्टाची जी भूमिका आहे. तीच सरकारची भूमिका आहे. महाराष्ट्र सरकार (maharashtra government) नेहमी न्यायालयाच्या आदेशाचं पालन करतं. भोंग्यांचा विषय राजकीय दृष्ट्या तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ही राजकीय भोंगेबाजी आहे, असं सांगतानाच आता योगी कोण? भोगी कोण?, हे योगी आणि भोगी संदर्भातील मतपरिवर्तन अचानक कसं झालं? हा एक संशोधनाचा विषय आहे. एखाद्या विद्यार्थ्याने त्यावर पीएचडी करायला हवी. फार इंटरेस्टिंग विषय आहे, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यावर नाव न घेता केली. महाराष्ट्रात अनेक सभा होतात. राष्ट्रवादीची (ncp) कोल्हापुरात सर्वात मोठी सभा झाली. ती सर्वांनीच पाहिली. महाराष्ट्राला सभेचं वावडं आहे का? त्या दिवशी सहा सभा आहेत. अटी शर्तीचं मला माहीत नाही. त्या त्या जिल्ह्याचे पोलीस आयुक्त कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेतात, असंही राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना सांगितलं.
उत्तर प्रदेशातील सरकारने लाऊडस्पीकरबाबत काही निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाचं पालनं करण्यासाठीचा हा निर्णय आहे. आम्ही तेच म्हटलं. त्यामुळे गृहमंत्र्यांनी सर्वांना बोलावलं होतं. पण भाजपने बैठकीवर बहिष्कार टाकला. याचा अर्थ तुम्ही राजकारण करत आहात. तुम्हाला महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची आहे. लोकांची दिशाभूल करायची आहे. तुमची मर्जी. लाऊडस्पीकरबाबत एक राष्ट्रीय धोरण तयार केलं पाहिजे. ते लागू व्हावं. कोणत्याही पक्षाचं सरकार असो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला तर पालन केलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.
यावेळी पुन्हा एकदा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोले लगावले. ज्या ठिकाणी तुमचं सरकार नाही त्या मुख्यमंत्र्यांबाबत तुम्ही द्वेष पूर्ण बोलायला नको. आम्हालाही स्वाभिमान आहे. पंतप्रधानांना सामनातून लक्ष्य केलं नाही. पंतप्रधान म्हणून त्यांच्याकडून ही अपेक्षा नव्हती. देशाचे पंतप्रधान एका पक्षाचे नसतात. ते देशाचे असतात. ज्या राज्यात सरकार नाही. त्याबाबत संवेदशनशील असलं पाहिजे. पण दुर्देवाने सावत्रपणाची वागणूक मिळते. त्यांची आर्थिक कोंडी केली जाते. म्हणून उद्धव ठाकरे आणि ममता बॅनर्जी यांनी आवाज उठवला आहे. ते अग्रलेखात छापलं आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
कोणताही समाज हिंसेचा सहारा घेत असेल तर समाज अधोगतीला जातो या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानाचं त्यांनी समर्थन केलं. भागवतांचं अभिनंदन करतो. त्यांनी हा विषय पुढे आणला. देशात त्यावर विचार व्हावा. कोणताही समाज हिंसेचं अवलंब करत असेल तर तो अधोगतीला जातो. त्याचं स्वागत व्हायला हवं. त्यावर मंथन व्हावं, असं त्यांनी सांगितलं.