sharad pawar ajit pawar | अजितदादा आणि शरद पवार यांच्या भेटीगाठींमागचं खरं कारण काय?, पडद्यामागे काय घडतंय; संजय राऊत यांचा ‘रोखठोक’ गौप्यस्फोट
संजय राऊत यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर नवं भाष्य केलं आहे. या दोन्ही नेत्यांची भेट राजकीय नव्हती. ती कौटुंबिकही नव्हती असं संजय राऊत यांनी आजच्या रोखठोकमध्ये म्हटलं आहे.
मुंबई | 20 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात भेटीगाठी वाढल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अजित पवार यांनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानंतरही पवार काका पुतण्यांची भेट झाल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. अजित पवार यांच्या भाजपसोबतच्या हातमिळवणी मागे शरद पवार यांचीच खेळी असल्याचंही सांगितलं जात आहे. मात्र, ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या भेटीमागचं नवं कारण समोर आणलं आहे. त्यामुळे आता वेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
संजय राऊत यांनी दैनिक ‘सामना’तील रोखठोकमधून हे विधान केलं आहे. शरद पवार आणि अजित पवार यांची भेट राजकीय नसेल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी अनेक संस्था उभारल्या आहेत. शिक्षण, सहकार, कृषी क्षेत्रातील या संस्था आहेत. त्या संस्थांवर शरद पवार यांनी अजितदादांना घेतलं आहे. त्यामुळे आता त्या संस्थांचं पुढे काय करायचं यावर चर्चा करण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. शरद पवार यांच्या हयातीतच अजितदादांनी त्यांच्या पक्षांवर दावा सांगितला. तिथे या संस्थांचे काय? असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
तर अजित पवार कोण?
अजित पवार हे आजच्या घडीला राजकारणातील बडे नेते आहेत. पण सत्तेची गदा आणि शरद पवार यांचे नाव नसेल तर अजित पवार कोण? असा प्रश्न महाराष्ट्राल पडेल, असा टोला राऊत यांनी लगावला आहे. शरद पवार यांनीच अजितदादांना राजकारणात आणलं आणि त्यांना यशाच्या शिखरावर नेवून ठेवलं. पण अजितदादांनी पवारांना त्याच शिखरावरून ढकलण्याचा प्रयत्न केला आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
भवितव्याची चिंता
शरद पवार यांनी विद्या प्रतिष्ठानपासून कृषी, शेती आणि सहकाराचे मोठे जाळे उभे केले आहे. या क्षेत्रात संस्था उभ्या केल्या आहेत. या संस्थांमध्ये हजारो शेतकरी, कष्टकरी आणि विद्यार्थी आहेत. त्यांच्या भविष्याची चिंता आहे. ते ठरवण्यासाठीच पवार काका पुतण्यांमध्ये चर्चा झाली असावी, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
अजितदादा सुतार पक्षी
बाळासाहेब ठाकरे यांनी एक व्यंगचित्र काढले होते. त्यात सर्व राजकीय पक्षाचे नेते होते. सर्वांना पक्ष्यांच्या रुपात दाखवलं होतं. शरद पवार हे सुतार पक्ष्याच्या रुपात होते. ते खुर्चीला चोच मारत असल्याचं दाखवलं होतं. आज 40-45 वर्षानंतर अजितदादा सुतार पक्ष्याच्या भूमिकेत आहेत. त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाला भोक पाडलं आणि उडून गेले. आता अजितदादा भाजपसोबत आहे. फडणवीस यांच्या मदतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीला भोकं पाडण्याचं काम अजित पवार करतील हे नक्की झालं आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.