मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी पुन्हा एकदा भोंग्याचा राग आळवला आहे. आधी 3 मे डेडलाईन दिल्यानंतर आता त्यांनी 4 मेची डेडलाईन दिली आहे. मशिदीवरील भोंगे हटवले नाही तर मशिदीसमोरच हनुमान चालिसा (hanuman chalisa) सुरू करा, असं आवाहन त्यांनी देशभरातील हिंदूंना केलं आहे. अनेक वर्षाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावाच असंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यावर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी पलटवार केला आहे. महाराष्ट्र हे लेच्यापेच्यांचं राज्य नाहीये. राज्यातील परिस्थिती बदलेल असं मला वाटत नाही. गृहमंत्री आहेत. लोकनियुक्त सरकार आहे. त्यामुळे काय करायचं हे त्यांना माहीत आहे, असा सूचक इशाराच राऊत यांनी दिला आहे. त्यामुळे परवा राज्य सरकार मनसेला कशी आवर घालणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
संजय राऊत हे मीडियाशी संवाद साधत होते. अजान भोंगे असतील कायद्याचा विषय. कोणत्या सेक्शनखाली कारवाई करायची. पोलीस काय म्हणतंय, कोर्ट काय म्हणतंय त्यानुसार काम होईल. तुम्हाला काहीच काम नसेल तर महाराष्ट्र आणि देशाचं वातावरण खराब करत आहात. स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठी हे राजकीय हिताचं नाही. हे राष्ट्राला मारक आहे. राष्ट्रीय एकात्मतेला मारक आहे. आम्ही त्याविरोधात लढाई लढली आहे. संघर्ष केला आहे. त्यानंतर कोर्टाने काही निर्णय दिले आहेत. या देशात कायद्याचं राज्य असेल तर प्रत्येकाने कायद्याचं पालन केलं पाहिजे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.
यावेळी राऊत यांनी बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनाही झापलं. सीबीयाने तपास केला आहे. सीबीआयने केलेल्या तपासाची पानं तपासावी. केंद्रीय गुप्तचर खात्याचा अहवाल तपासावा. हे अज्ञानी लोकं आहेत, त्यांनी ती पानं वाचली तर शिवसेना कोठे आहे हे त्यांना कळेल. कुठे होती हे कळेल. इतक्या वर्षांनी फुलबाजी उडवायला झालं काय? तो विषय संपला आहे. तरी का काढत आहे? राम मंदिर उभं राहत आहे. वातावरण बदललं आहे. प्रश्न बदलले आहेत. मूळ प्रश्वावरून लक्ष उडवण्यासाठी भाजप त्यांचे पक्ष आणि त्यांचे नवीन साथीदार गुप्त, छुपे हे सर्व या विषयाकडे आकर्षित करतात पण लोक त्यात पडणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.