Bhagat Singh Koshyari : नव्या राज्यपालांना सूचना, सल्ला आणि इशारा; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?

| Updated on: Feb 12, 2023 | 12:19 PM

नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावं. राजभवनाचं भाजप मुख्यालय बनवू नये. राज्यात विरोधी पक्षाचा आवाज आहे. घटनेनुसार आहे. तो ऐकायला हवा. सरकारच घटनाबाह्य आहे. याचं भान राज्यपालांनी ठेवलं पाहिजे.

Bhagat Singh Koshyari : नव्या राज्यपालांना सूचना, सल्ला आणि इशारा; संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
ramesh bais
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला आहे. त्यांच्या जागी रमेश बैस यांची राज्याचे नवे राज्यपाल म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. नव्या राज्यपाल नियुक्तीचं विरोधी पक्षांनी स्वागत केलं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही नव्या राज्यपालांचं स्वागत केलं आहे. मात्र, हे स्वागत करताना त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांना शुभेच्छा दिल्याच. पण सूचना, सल्ला देतानाच इशाराही दिला आहे. बैस आहे की बायस आहेत हे माहीत नाही, असं सांगतानाच राज्यपालांनी घटनाबाह्य सरकारच्या शिफारशी मान्य करताना भान ठेवावं. नाही तर पुन्हा संघर्ष होईल, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. नवीन राज्यपालांनी घटनेनुसार काम करावं. राजभवनाचं भाजप मुख्यालय बनवू नये. राज्यात विरोधी पक्षाचा आवाज आहे. घटनेनुसार आहे. तो ऐकायला हवा. सरकारच घटनाबाह्य आहे. याचं भान राज्यपालांनी ठेवलं पाहिजे.

हे सुद्धा वाचा

ज्या सरकार विरोधात कोर्टात सुनावणी आहे, त्याचे निर्णय आणि शिफारशी किती आणि कश्या मान्य करायच्या याचं भान राज्यपालांना ठेवावं लागेल. नाही तर पुन्हा संघर्ष होईल, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे.

बैस यांना ओळखतो, स्वागत

राज्याला नवे राज्यपाल मिळाले. रमेश बैस त्यांच्या नावात बैस आहे की बायस आहे हे माहीत नाही. त्यांनी घटनेनुसार काम केलं तर त्यांचं स्वागत होईल, असं सांगतानाच मी बैस यांना ओळखतो. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात ते मंत्री होते. ते सुस्वभावी आहेत. नवीन राज्यपालांचे स्वागत करतो, असं राऊत म्हणाले.

राज्यपालांना भेटणार

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी नव्या राज्यपालांच्या नियुक्तीचं स्वागत केलं आहे. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल रमेश बैस यांच्याशी आताच फोनवर बातचीत झाली. महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने जे काही योगदान द्यायचं ते देणार असल्याचं नव्या राज्यपालांनी सांगितलं.

शिंदे फडणवीस सरकार आणि महाराष्ट्रातील राज्यपाल आता ट्रिपल इंजन वाली सरकार अधिक अधिक गतीने काम करेल याचा मला विश्वास आहे, असं सांगतानाच उद्या भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी राजभवनात जाणार असल्याचं सोमय्या यांनी सांगितलं.

इच्छा व्यक्त केली

मी आजीवन अविवाहित राहून देशाची सेवा केली. देवभूमीत मी मुख्यमंत्री म्हणून जनतेची सेवा केली. संसदेतही सेवा केली. मी सेवा करण्याचा पूर्ण प्रयत्न केला. मात्र आता वयोमानानुसार मला अध्ययन करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी राज्यपाल पदावरून मुक्त करावं अशी इच्छा राज्यपाल कोश्यारी यांनी पंतप्रधानांकडे व्यक्त केली होती.

त्यांच्या या विनंतीचा विचार झाला आणि त्यांचा राजीनामा स्वीकार करण्यात आला, असं भाजप नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं.

हा विरोधकांचा दुटप्पीपणा

राज्यपालांनी वादग्रस्त विधान केलं तेव्हा त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. पण राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अत्यंत हीन दर्जाच्या शब्दांचा वापर केला. मात्र त्यांना कोणी माफी मागावी, पदावरून राजीनामा द्यावा असं म्हटलं नाही. याचं मला आश्चर्य वाटतं. हा विरोधकांचा दुटप्पीपणा आहे. राजकारणासाठी हे अतिशय धोकादायक आहे, असंही ते म्हणाले.