Sanjay Raut | ‘शिवसेना काय तुमच्या बापाची आहे का भो***?’, संजय राऊत यांची निवडणूक आयोगावर अर्वाच्य शब्दांत टीका
संजय राऊत आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान भाषण करताना राऊत यांची जीभ पुन्हा घसरली आहे. त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर (Election Commission of India) अतिशय खालच्या शब्दांत टीका केली आहे.
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात हक्कभंगाची कारवाईची मागणी केली जात असताना एक आणखी महत्त्वाची बातमी समोर आलीय. संजय राऊत यांचा बोलताना तोल जाताना दिसतोय. संजय राऊत आज सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान भाषण करताना राऊत यांची जीभ पुन्हा घसरली आहे. त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर (Election Commission of India) अतिशय खालच्या शब्दांत टीका केली आहे. त्यांच्या या वादग्रस्त विधानामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) आगामी काळात अनेक घडामोडी घडू शकतात.
“संघर्ष करणं हा शिवसैनिक आहे. उपाशी राहुन घरची चटणी-भाकर खाऊन तुम्हाला आमदार-खासदार, मंत्री केलं आहे. शिवसैनिक इथेच आहेत आणि तुम्ही ज्यांना निवडून दिलं ते 50 खोके देवून पळून गेले आहेत. आणि निवडणूक आयोग सांगतोय शिवसेना त्यांची आहे, तुमच्या बापाची आहे का भो***? ही शिवसेना निवडणूक आयोगाने निर्माण केली का?”, असं संजय राऊत सांगलीच्या कार्यक्रमात म्हणाले.
’50 खोके एकदम ओके’
“खूप वर्षांनी मी सांगलीत आलोय. सांगलीत प्रवेश केल्यापासून रस्त्या-रस्त्यावर शिवसैनिकांनी स्वागत केलं. यामध्ये सर्वात जास्त मुस्लिम बांधव होते. शिवसैनिकांनी गर्जना करत स्वागत केले. सांगलीचे आमदार-खासदार निवडून आले हे परत निवडून येणार का? 50 खोक्यांच्या एवढ्या घोषणा झाल्या की जगात कुठली गोष्ट लोकप्रिय झाली नाही आणि वाऱ्यासारखी पसरली नाही. पण आतापर्यंत आम्ही बघितलं, हे वारे झाले ते वारे झाले. पण 50 खोके एकदम ओके हे अख्ख्या जगात पोहचलं आहे”, असं संजय राऊत म्हणाले.
‘जनता पक्षाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही’
“मुख्यमंत्री विषयी बोलणं योग्य नाही. सन्मान राखला पाहिजे. पण जर जनतेच्या भावना असतील तर मी काही बोलणार नाही. ज्यांनी शिवसेने सोडली त्यांना आणि सगळ्या भारतीय जनता पक्षाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही. शिंदे आणि चाळीस चोरांनी, दिल्लीच्या रंगा बिल्लांनी काय समजलं? निवडणूक आयोगाने शिवसेना आणि शिंदे यांच्या घशात घातली. त्यानंतर राज्यात वणवा पेटला आहे”, असा दावा राऊतांनी केला.
“शिवसेनेची ताकद कोणाच्या दावणीला लागणार नाही. प्रत्येक जण म्हणतोय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला परत महाविकास आघाडीचे राज्य आणायचं आहे. महाविकास आघाडीचं राज्य आणायचं आहे. त्यासाठी सांगलीचा वाटा पहिजे. काही घटकेचे सरकार आहे. आधी 16 आमदार अपात्र ठरणार आहेत. हिमतीचा सागर तो कसा आटणार?”, असा सवाल त्यांनी केला.
“वसंतदादा पाटील, नाना पाटील यांनी बाळासाहेब ठाकरे यांना जेव्हा-जेव्हा मुंबईवर दिल्लीचे आक्रमण झाले, त्यावेळी ते शिवसेनेच्या पाठीशी उभे राहिले. काँग्रेसचे मोठे नेते शिवसेनेच्या पाठिशी होते. भाजपने पाठीत खंजीर खपूसले. हे भांडण आता 40 चोरांशी नाही, भाजपशी आहे”, असं राऊत म्हणाले.
“भारतीय जनता पार्टीला गावात पोस्टर लावायला दोन माणसे मिळत नव्हती. त्यांना आपण खांद्यावर घेऊन मिरवलं. आता त्याच खांद्यावर अंतयात्रा. याची महाराष्ट्र वाट बघतोय. या महाराष्ट्राला उत्तम असं नेतृत्व महाराष्ट्राने दिलं. मात्र कोरोनाचा काळ आला आणि कुटुंबप्रमुख म्हणून आपल्या सर्वांचे प्राण उद्धव ठाकरे यांनी वाचवले. आणि दुर्दैवाने ठाकरे आजारी पडले. आणि त्याचा गैरफायदा घेऊन या भाजपने हे सरकार पाडले. असे महाराष्ट्रात कधी घडले नाही. अशी निर्घृण माणसे सत्तेवर बसले आहेत याचा बदला आपण घेतला पाहिजे”, असंदेखील राऊत म्हणाले.