शिंदे साहेबांसारखा तूही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात उठाव कर; ठाकरे गटाच्या आमदाराला शिंदे गटाच्या आमदाराची चिथावणी
शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड करण्याची चिथावणी दिली आहे. विधानसभेच्या पायऱ्यावर गप्पा मारत असतानाच शिरसाट यांनी नाईक यांना शिंदे गटात येण्याची ऑफरही दिली. या दोन्ही नेत्यांच्या संभाषणाचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
निवृत्ती बाबर, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 20 फेब्रुवारी 2024 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर अनेक आमदार शिंदे यांना जाऊन मिळाले. आमदारांपाठोपाठ खासदारांचा एक गटही एकनाथ शिंदे यांच्या बाजूने गेला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या चिरफळ्या उडाल्या. आता लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत. असं असतानाही शिंदे गटाने ठाकरे गटाचे आमदार आपल्याकडे खेचण्यासाठी कसोशिने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांचं ताजं उदाहरण समोर आलं आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांच्यातील संवादाचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यात शिंदे गटाचे आमदार शिरसाट हे ठाकरे गटाचे आमदार नाईक यांना खुली चिथावणी देताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आज एक दिवसाचं अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. यावेळी सर्वच आमदार विधानसभेत हजर होते. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी आमदारांनी एकमेकांच्या भेटीगाठी घेतल्या. ख्याली खुशाली विचारली. याचवेळी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचीही भेट झाली. विधानभवनाबाहेरच ही भेट झाली. यावेळी दोघांमध्ये संवादही झाला. चर्चा सुरू असतानाच शिरसाट यांनी वैभव नाईक यांना शिंदे गटात येण्याची ऑफर केली. एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बंड केलं. तुही उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड कर, अशी चिथावणी संजय शिरसाट यांनी दिली. तसेच तू आमच्याकडे आल्यावर आपण दोघेही मंत्रीपदाची शपथ घेऊ, असं आमिषही त्यांनी नाईक यांना दाखवलं. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
काय झालं संभाषण?
वैभव नाईक – तुम्ही शपथ कधी घेताय?
संजय सिरसाट – तू आला तर आमच्याकडे विस्तार होईल ना…
वैभव नाईक – अजित पवार आले, अशोक चव्हाण आले…
शिरसाट – आता जयंत पाटील येतील तिकडनं. आणि इकडनं तू येणार आहेस. म्हणजे आपल्याला…
वैभव नाईक – मी येणार होतो ते राहूदे… आता तुमच्या शपथविधीच काय झाले ते सांगा?
शिरसाट – तू आल्यावर आपण सोबत घेऊ ना.
वैभव नाईक – तुम्ही आता फाऊंडर मेंबर त्या शिवसेनेचे. त्या शिवसेनेचे आणि या शिवसेनेचे.
शिरसाट – दोन्हीचे.
नाईक – मग कधी करणार ते सांगा?
शिरसाट – ते होईल ना…
नाईक – कधी पण?
शिरसाट – तू आल्यावर होईल. नाहीतर तू तरी शिंदे साहेबांसारखे कर.
वैभव नाईक – आम्ही सांगतो आहे की, उठाव केला त्या लोकांना दिलं पाहिजे. आम्ही काय कधी येणार नाही. आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच.
शिरसाट – नक्की
नाईक – शंभर टक्के नक्की. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतच.
शिरसाट – वायकर पण असंच म्हणत होते.
नाईक – नाही नाही, वायकर असू देत, ते म्हणत असतील. पण आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंसोबतच.