वाजपेयी यांचं सरकार एका मताने पडलं होतं हे लक्षात ठेवा; औकातीनंतर आता शिंदे गटाचा भाजपला निर्वाणीचा इशारा
जो सर्वे झाला आहे त्यात सर्व काही पॉसिटीव्ह आहे. दोन्ही पार्टीचे सर्वे चालू आहेत. वरिष्ठ त्यावर निर्णय घेतील. आम्ही कोण आहोत निणर्य घेणारे? कार्यकर्त्यांची मागणी असते जागेची पण शेवटी पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील, असं संजय शिरसाट म्हणाले.
मुंबई : शिंदे गट आणि भाजपमधील नेत्यांमधील ठणाठणी अजून थांबतांना दिसत नाहीये. दोन्ही पक्षातील नेते एकमेकांवर तोंडसुख घेताना दिसत आहे. भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ठाणे म्हणजे महाराष्ट्र वाटत असल्याचं म्हणत डिवचलं होतं. त्यानंतर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी बोंडे यांना औकातीत राहण्याचा सल्ला दिला होता. हा वाद सुरू असतानाच आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
आमदार संजय शिरसाट यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपला निर्वाणीचा इशारा दिला आहे. वाजपेयींच्या काळामध्ये 1 मताने सरकार पडलं होतं याचा विचार भाजपने करायला पाहिजे. हातात हात घेऊन पुढे चालावं. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये अवघड होईल, असा थेट इशारा शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी दिला आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटात सर्व काही अलबेल नसल्याचं स्पष्ट झालं आहे. आता शिरसाट यांच्या या इशाऱ्यावर भाजप काय प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
युतीत दरड पाडू नका
लोकसभेच्या जागा वाटपाच्या संदर्भात दोन्हीही पक्षाचे वरिष्ठ नेते विचार करून निर्णय घेतील. सध्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेकडून सर्वे सुरू केलेला आहे. त्या त्या मतदारसंघात कोणाचं वर्चस्व आहे? कोण निवडून येईल? याचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल. मात्र अशा पद्धतीने विधाने करून युतीमध्ये दरड पाडण्याचा प्रकार करू नका, अशी विनंती मला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना करायची, असंही ते म्हणाले.
बच्चू भाऊ खरच बोलले
अनिल बोंडे हे माझे मित्र आहेत. मात्र अशा वक्तव्यामुळे पक्षश्रेष्ठींची आपल्यावर मर्जी होईल असं त्यांना वाटत असेल. पण तसं होणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्याचे मुख्यमंत्री नाहीत तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावं. शिंदे हे ठाण्याचे नाही तर महाराष्ट्राचे नेते आहेत, असं सांगतानाच बच्चू भाऊ बोलले ते खरंच आहे. योग्य आहे. जर आम्ही भारतीय जनता पार्टी सोबत आलो नसतो तर सरकार स्थापन झालं नसतं, असंही ते म्हणाले.
वाद कुठे नाहीत?
वाद कुठे होत नाहीत? सगळीकडे होतात. यामुळे विरोधकांच्या बत्या पेटल्यात. ही जागा कोणाला ती जागा कोणाला हे आपण ठरवणार आहेत का? वरचे नेते ठरवतील. शक्यतो असे वक्तव्य टाळले पाहिजे. उत्साहाच्याभरात एखाद्याची बाजूने असे वक्तव्य केले असेल तर आम्ही त्याला जास्त महत्त्व देत नाहीत. आमच्यामध्ये सगळे आलबेल आहे. शिंदे आणि फडणवीस एकमेकांच्या हातात हात घालून काम करत आहेत, असंही ते म्हणाले.