फडणवीसांसोबत नेमकी काय चर्चा झाली? मस्साजोगहून मुंबईत आलेल्या देशमुख कुटुंबियांचा खुलासा
बीड सरपंच हत्या प्रकरणातील पीडित देशमुख कुटुंबिय आज मुंबईत आले. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या 'सागर' बंगल्यावर जावून भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी महत्त्वाची माहिती दिली.
बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्राचे राजकारण तापलं आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावरुन मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या दरम्यान आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. संतोष देशमुख यांचे कुटुंबिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आज मस्साजोग गावाहून मुंबईत दाखल झाले. देशमुख कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ बंगल्यावर जावून त्यांची भेट घेतली. यावेळी देशमुख कुटुंबियांनी संबंधित प्रकरणावर मुख्यमंत्र्यांकडे सविस्तर भूमिका मांडली. यावेळी फडणवीस यांनी देशमुख कुटुंबियांना संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांवर कठोरात कठोर शिक्षा देऊ, असं आश्वासन दिलं. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत काय चर्चा झाली? याबाबत माहिती दिली.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या दिवशी अधिवेशनात सांगितलं होतं तेच आम्हाला आता सांगितलं आहे. जे आरोपी आहेत त्यांना कुणालाही सोडणार नाही. त्यांना शिक्षा होणारच आहे. या प्रकरणातून महाराष्ट्राला उदाहरण मिळणार आहे की, गुन्हेगाराला इथे माफ केलं जात नाही. तसं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे”, असं धनंजय देशमुख यांनी सांगितलं.
‘आम्हाला न्याय हवा’
“आम्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. निवेदन दिलं नाही. आमदार सुरेश धस निवेदनाबाबत आधीच बोलत होते. आम्ही त्यांना आमच्याकडे असणारे काही पुरावे दाखवले. आम्हाला न्याय हवा आहे. तो न्याय कसा मिळतो ते मुख्यमंत्र्यांना सांगितलं”, असंही धनंजय देशमुख म्हणाले.
‘गेल्या चार-पाच महिन्यांचे FIR मुख्यमंत्र्यांना दाखवले’
“आम्ही फक्त न्यायाची भूमिका मांडली. मुख्यमंत्री निर्णय घेतील. या प्रकरणात नि:पक्षपातीपणे तपास झाला पाहिजे. याबाबत ते हो म्हणाले. या गुन्ह्यात कुणीही असलं आणि कितीही मोठी व्यक्ती असली तरी त्याला शिक्षा होणार”, असं धनंजय देशमुख म्हणाले. “आम्ही जी एफआयआर आहे, त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांना बोललो. जी घटना घडली त्या कालावधीत सगळ्यांचे सीडीआर काढा, अशी विनंती केली. आमचं फक्त एफआयआरबाबत बोलणं झालं. गेल्या चार-पाच महिन्यांपासूनच्या ज्या एफआयर आहेत, त्यांचा एकमेकांशी आणि या प्रकरणाशी कसा संबंध आहे, याचे पुरावे मी मुख्यमंत्र्यांना दिले”, असं धनंजय देशमुख यांनी सांगितलं.
“आम्हाला चौकशीचा अहवाल मिळवण्याबाबतही चर्चा झाली. पुढच्या दोन दिवसांत आम्हाला तपासाचा अहवाल मिळणार आहे. एसआयटीबाबत प्रश्न विचारला असता, आम्हाला जे बदल करायचे आहेत ते आम्ही सांगितलं आहे”, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.