अखेर ठरले…साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांनाच महायुतीची उमेदवारी
satara lok sabha constituency Udayanraje Bhosle: महायुतीकडून साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध ते लढणार आहे. उदयनराजे भोसले येत्या गुरुवारी आपला अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
सातारा लोकसभेच्या जागेवरुन महायुतीत असणारा वाद आता मिटला आहे. महायुतीकडून साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याविरुद्ध ते लढणार आहे. महायुतीत साताऱ्याच्या जागेवरुन गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु होता. भाजप, शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपआपला दावा केला जात होता. परंतु भारतीय जनता पक्षाकडून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्याचे स्पष्ट संकेत दिले गेले होते. त्यामुळे त्यांनी प्रचारही सुरु केला होता. तसेच काही दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे स्पष्ट संकेत दिले गेले होते. परंतु अधिकृत घोषणा होण्यास दीर्घ कालावधी लागला.
भाजपच्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव उमेदवार
भारतीय जनता पक्षाकडून लोकसभेसाठी मंगळवारी बारावी यादी जाहीर करण्यात आली. त्या यादीत महाराष्ट्रातील एकमेव उदयनराजे भोसले यांचे नाव आहे.
नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग जागेचे नाव अजून नाही. भाजपच्या यादीत पंजाब, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील उमेदवारांची नावे त्यात आहे. उदयनराजे भोसले आता १८ एप्रिल रोजी अर्ज भरण्याची शक्यता आहे. त्यांनी दोन दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज घेतला होता. भाजपकडून बंडखोरी होऊ नये म्हणून शेवटच्या क्षणी उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर करण्यात आले.
शिवसेनेकडून ‘आता नाही, तर कधीच नाही’
दिल्लीतून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी मिळण्याचा थेट संदेश मिळाला होता. त्यामुळे तिकीट जाहीर झाले नसताना त्यांनी आपले काम सुरु केले होते. दुसरीकडे साताऱ्याच्या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस आपला दावा सोडत नव्हता. तसेच शिवसेनाही आक्रमक होती. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव तयारी सुरु केली होती. त्यांनी सोशल मीडियावर ‘आता नाही, तर कधीच नाही’ असा स्टेटस ठेवले होते. यामुळे भाजपने कळजी घेऊन शेवटच्या क्षणी उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर केले.