शाळेत जावं लागतं आता; इयत्ता आठवीपर्यंत मोफत गणवेश मिळणार; शिक्षण सेवकांचा मानधनात घसघशीत वाढ
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष 2023-24चा अर्थसंकल्प आज सादर केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी भरीव शिष्यवृत्ती आणि मोफत गणवेशाची घोषणा केली.
मुंबई : राज्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या अर्थसंकल्पातून आरोग्य आणि कृषीसह महिला सक्षमीकरणावरही भर दिला आहे. त्याचप्रमाणे त्यांनी शिक्षणासाठी मोठी तरतूद केली आहे. विद्यार्थ्यांचा सरकारी शाळांकडील ओढा वाढावा म्हणून फडणवीस यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. इयत्ता आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देण्याची घोषणा फडणवीस यांनी केली आहे. तसेच शिक्षण सेवकांच्या पगारातही घसघशीत वाढ केली आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये आनंदाचं वातावरण असून फडणवीस यांच्या घोषणेचं स्वागत केलं जात आहे.
अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्ष 2023-24चा अर्थसंकल्प आज सादर केला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसाठी भरीव शिष्यवृत्ती आणि मोफत गणवेशाची घोषणा केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये इयत्ता आठवीपर्यंत सर्व प्रवर्गांच्या विद्यार्थ्यांना गणवेश मोफत देणार आहे. तसेच इयत्ता 5 ते 7 वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती 1000 वरुन 5000 रुपयाने वाढ करण्यात आली आहे. तसेच इयत्ता 8 ते 10 वीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत 1500 वरुन 7500 रुपये वाढ करण्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.
शिक्षण सेवकांचे मानधन वाढले
यावेळी शिक्षणसेवकांच्या मानधनात 10 हजार रुपयांने वाढ करण्यात आली. प्राथमिक व उच्च प्राथमिक शिक्षणसेवकांच्या मानधनात 6000 वरुन 16,000 रुपये, माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात 8000 वरुन 18,000 रुपये, उच्च माध्यमिक शिक्षण सेवकांच्या मानधनात 9000 वरुन 20,000 रुपये वाढ करण्यात आली.
वैद्यकीय महाविद्यालये बांधणार
राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची बांधकामे करण्यात येणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं. सातारा, अलिबाग, सिंधुदुर्ग, धाराशिव, परभणी, अमरावती, भंडारा, जळगाव, रत्नागिरी, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, अंबरनाथ (ठाणे) येथे वैद्यकीय महाविद्यालये बांधण्यात येणार आहे. मानसिक अस्वास्थ आणि व्यसनाधीनतेची वाढती समस्या पाहता जालना, भिवंडी, पुणे, नागपूर येथे नवीन व्यसनमुक्ती केंद्रेही बांधण्यात येणार असल्याची घोषणा आजच्या अर्थसंकल्पातून करण्यात आली आहे.
पत्रकारांच्या कल्याण निधीत भरीव वाढ
शंकरराव चव्हाण सुवर्णमहोत्सवी पत्रकार कल्याण निधी मध्ये 2023-2024 या वर्षासाठी 50 कोटी रुपये वाढवून देण्यात येत असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री फडणवीस यांनी आज विधानसभेत अर्थसंकल्पीय भाषणात केली. त्यामुळे पत्रकारांना मोठा दिलासा मिळाला आहे.