Rajya Sabha Election 2022: नवाब मलिक, अनिल देशमुख राज्यसभेसाठी मतदान करणार का?, कोर्ट आज देणार निर्णय
Rajya Sabha Election 2022: सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे. मात्र, भाजपने सातवा उमेदवार दिल्याने ही लढत अत्यंत चुरशीची झाली आहे. आघाडी आणि भाजपची मदार अपक्ष मतांवर असल्याने या निवडणुकीत एका एका मताचं महत्त्व वाढलं आहे.
मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच तुरुंगात असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (nawab malik) आणि अनिल देशमुख (anil deshmukh) यांना राज्यसभेच्या निवडणुकीत (Rajya Sabha Election 2022) मतदान करण्याची संधी मिळेल का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. आजच या अर्जावर निकाल येईल असं सांगितलं जात होतं. मात्र, तब्बल तीन ते चार तासाच्या युक्तिवादानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. आज सकाळी 11 वाजता त्यावर निकाल देणार आहे. राज्यसभेच्या निवडणुकीच्या एक दिवसआधीच हा निकाल येणार असल्याने आघाडीच्या नेत्यांची धाकधुक वाढली आहे. या दोन्ही नेत्यांना मतदान करता यावं म्हणून राष्ट्रवादीने कोर्टात धाव घेतली होती. तर ईडीने त्याला आक्षेप घेतला होता. त्यामुळे या दोन्ही नेत्यांना मतदान करता येणार की नाही? असा सवाल करण्यात येत होता. मात्र कोर्टाकडून निर्णय राखून ठेवल्याने त्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
सहा जागांसाठी राज्यसभेची निवडणूक होत आहे. मात्र, भाजपने सातवा उमेदवार दिल्याने ही लढत अत्यंत चुरशीची झाली आहे. आघाडी आणि भाजपची मदार अपक्ष मतांवर असल्याने या निवडणुकीत एका एका मताचं महत्त्व वाढलं आहे. त्यामुळे कोणतंही मत वाया जाऊ नये म्हणून आघाडीने खबरदारी घेतली आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे तुरुंगात आहेत. त्यांची दोन मते अत्यंत महत्त्वाची असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने कोर्टात धाव घेतली होती. कोर्टाने याचिका दाखल करून घेत 8 जून रोजी त्यावर फैसला देणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर आज मुंबई सत्र न्यायालायात दोन्ही बाजूच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. अनेक दाखलेही कोर्टात देण्यात आले. तब्बल तीन ते चार तास हा युक्तिवाद चालला. दोन्हीकडचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर यावर उद्या निकाल देणार असल्याचं कोर्टाने म्हटलं आहे.
कायदा काय सांगतो?
राष्ट्रपती पदाची निवडणूक होती. ती 2017 मध्ये झाली होती. मात्र 27 एप्रिल 2019 रोजी निवडणूक आयोगाने आपले नियम अद्ययावत करुन नवीन नियमावली आपल्या वेबसाईटला टाकली आहे. त्यामुळे देशमुख आणि मलिक यांना मतदानाचा अधिकार मिळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं.
भुजबळांनीही मतदान केलं होतं
जुलै 2017मध्ये राष्ट्रपतीपदाची निवडणूक पार पडली होती. रामनाथ कोविंद हे राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मैदानात होते. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि रमेश कदम हे तुरुंगात होते. या दोन्ही नेत्यांना मतदान करण्याची कोर्टाने परवानगी दिली होती. त्याच धर्तीवर राष्ट्रवादीने कोर्टात युक्तिवाद करत मलिक आणि देशमुखांना मतदान करू देण्याची विनंती कोर्टाला केली होती.