‘मी तुमची माल नाही साहेब; महिला आहे’, उद्धव ठाकरेंचं नाव घेत शायना एन. सी. यांचा अरविंद सावंतांवर घणाघात
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच महिलांचा सन्मान करतात. उद्धव ठाकरे अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर काहीच बोलत नाही. अरविंद सावंत म्हणतात, इम्पोर्टेड माल, मी तुमची माल नाही साहेब, आई मुंबादेवी आमची रक्षक आहे. मुंबादेवीची महिला तुम्हाला प्रत्युत्तर देणार", असं शायना एन. सी. म्हणल्या.
ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी शिवसेनेच्या मुंबादेवी मतदारसंघाच्या उमेदवार शायना एन. सी. यांनी मुंबईच्या नागपाडा पोलीस ठाण्यात जावून तक्रार केली. यानंतर त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर प्रसारमाध्यांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अरविंद सावंत यांच्यावर सडकून टीका केली. “ही एफआयआरची कॉपी आहे. ही महाविनाश आघाडी महिलांचा सन्मान करत नाही. देशभरात आज लक्ष्मीपूजन आहे. शुभ मुहूर्त आहे. पण अरविंद सावंत काय म्हणतात? तुम्ही इम्पोर्टेड माल आहात. माल म्हणजे आयटम. मला सार्वजनिक जीवनात आतापर्यंत 20 वर्षे झाले. तुम्ही सर्व जाणता की, मी किती निष्ठेने काम केलं आहे. मुंबादेवीचे आशीर्वाद आहेत. मी महिला आहे पण माल नाही”, असं शायना एन. सी. म्हणाल्या.
“आमच्यासारखे प्रोफेशनल महिला, सक्षम महिला किंवा कोणतीही महिला, त्यांच्याप्रती तुम्ही अभद्र टीका करणार असाल तर ही एफआयर आणि कायदा आपलं काम करेल. जेव्हा एखाद्या महिलाबद्दल तुम्ही अभद्र वक्तव्य करतात तेव्हा तुम्ही तिचा अवमान करतात. तुम्हाला वाटतं प्रत्येक महिला शांत राहणार. पण ही महाराष्ट्राची महिला उत्तर देणार”, असं प्रत्युत्तर शायना एन. सी. यांनी अरविंद सावंत यांना दिलं.
‘मी कुणाची माल नाही’
“एकीकडे आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे आहेत, ज्यांनी राज्यातील लाडक्या बहिणींसाठी किती गोष्टी केल्या, आणि दुसरीकडे आहेत अरविंद सावंत ज्यांनी 2019 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत आमच्यासारख्या महिलांना लाडकी बहीण म्हटलं. आमच्यासारख्या महिलांकडून प्रचार करुन घेतला. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा वापर करुन घेतला. आता म्हणतात की, मी इंपोर्टेड माल आहे. मी फक्त एवढंच सांगेन, मी मुंबईची मुलगी आहे. मुंबादेवीचा आशीर्वाद आहे. पण मी कुणाची माल नाही”, असं शायना एन. सी. म्हणाल्या.
‘मी तुमची माल नाही साहेब’
“अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी एसपी गटाचे प्रमुख शरद पवार शांत आहेत, काँग्रेसचे नाना पटोले शांत आहेत, पण महाराष्ट्र आणि मुंबईची महिला शांत राहणार नाही. हे एफआयआर माझं उत्तर आहे. एकीकडे सांगतात की, तुम्ही इम्पोर्टेड माल आहात. कशासाठी? तुम्हाला चर्चा करायची असेल तर चर्चा करा, बोलायचं असेल तर बोला. आई मुंबादेवीचे रक्षक आणि आशीर्वादासोबत आम्ही हे काम करणार. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमीच महिलांचा सन्मान करतात. उद्धव ठाकरे अरविंद सावंत यांच्या वक्तव्यावर काहीच बोलत नाही. अरविंद सावंत म्हणतात, इम्पोर्टेड माल, मी तुमची माल नाही साहेब, आई मुंबादेवी आमची रक्षक आहे. मुंबादेवीची महिला तुम्हाला प्रत्युत्तर देणार”, असं शायना एन. सी. म्हणल्या.
अरविंद सावंत यांचं वादग्रस्त वक्तव्य काय?
“शायना एन. सी. यांची अवस्था बघा. ते आयुष्यभर भाजपात राहिल्या आणि दुसऱ्या पक्षात चालल्या गेल्या. इंपोर्टेड माल इथे काम करत नाही. इथे फक्त ओरिजनल माल काम करतो”, असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलं होतं. याच वक्तव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरुन वाद निर्माण झाल्यानंतर सावंत यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. “माझं वक्तव्य त्यांनी चुकीच्या पद्धतीने घेतलं आहे. मी हिंदीमध्ये बोललो आहे माल म्हणून. पण इंग्रजीमध्ये मालला गुड्स असं बोललं जातं. मी बाहेरून आलेला माल आणि इथे ओरिजनल असलेला माल असं मी बोललो आहे. माझ वक्तव्य अर्ध दाखवण्यात आलं आहे. पण आता तुम्हाला महिला सन्मान लक्षात आला का? प्रज्ज्वल रेड्डीच्या प्रचारात पंतप्रधान गेले तेव्हा त्यांना महिला सन्मान आठवला नाही का? मंत्री संजय राठोड यांच्याच मंत्रिमंडळात होते ना? मग तेव्हा त्यांना महिला सन्मान आठवला नाही का?”, असं नंतर अरविंद सावंत म्हणाले आहेत.