Video | राजकारणात शरद पवार, अजित दादा, भुजबळांनी दिलेल्या संधीचं सोनं केलं; भाजपच्या लाडांचा स्वर झाला कातर…!
महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाज आणि पाणी काही वेगळचंय. ही आपली खरी आणि वेगळी ओळखय. त्याचीच एक चुणूक लाड यांनी बोलताना दाखवली. नेहमी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तुटून पडणाऱ्या भाजप नेते प्रसाद लाड यांचे एक वेगळे रूप त्या निमित्ताने उभ्या महाराष्ट्राला दिसले.
मुंबईः राजकारणात शरद पवार (Sharad Pawar), अजित दादा, छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मला संधी दिली. त्या संधीचं मी सोनं केलं, असं म्हणत आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांचे आभार मानले. लाड यांच्या सदस्यत्वाचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालाय. त्याबद्दल त्यांना सभागृहातून निरोप देण्यात आला. यावेळी बोलताना त्यांचा स्वर कातर झाला. ते जुन्या आठवणीत रमलेले दिसले. खरे तर हीच महाराष्ट्राच्या राजकारणाची खरी ओळख. त्यामुळेच विलासराव देशमुख, गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन हे तिघेही वेगवेगळ्या पक्षात असून, त्यांची मैत्री आपल्याला ठाऊकय. महाराष्ट्राच्या राजकारणाचा बाज आणि पाणी काही वेगळचंय. त्याचीच एक चुणूक लाड यांनी बोलताना दाखवली. नेहमी महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर तुटून पडणाऱ्या लाड यांचे एक वेगळे रूप त्या निमित्ताने सभागृहाला आणि उभ्या महाराष्ट्राला दिसले.
आमदारांची मुलगी पळवून केलं लग्न…
प्रसाद लाड यांनी यावेळी आपला खडतर जीवनप्रवास सांगितला. हमाली करण्यासून ते आमदार होण्यापर्यंत काय-काय खस्त्या खाल्ल्या याची माहिती दिली. लग्नाची आठवण सांगताना त्यांचा चेहरा पाहण्याजोगा होता. म्हणाले, आपण विधानपरिषद सदस्याच्या मुलीला पळवून नेत प्रेमविवाह केला. लग्नासाठी वयाची 18 वर्षे पूर्ण असल्याची अट होती. मी 19 व्या वर्षी लग्न केलं आणि 21 व्या वर्षी मुलगी झाली.
जयंत पाटलांमुळे…
जयंत पाटलांमुळे सिद्धीविनायक न्यासाचा मी 31 व्या वर्षी विश्वस्त झालो. तेव्हा शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ हे तिथे विश्वस्त होते. वडील 1968 मध्ये शिवसैनिक होते. परळमध्ये छोट्याशा खोलीत राहायचो. कॉलेजमध्ये शिकता शिकता प्रेमप्रकरण सुरू झालं. माझ्या पत्नीचे वडील बाबुराव भापसे विधानपरिषद सदस्य होते. दोन वेळा विधानपरिषद आणि एक वेळा विधानसभेचे आमदार राहिले. त्यावेळी त्यांचा मुंबईमधला रुबाब जेव्हा पाहायचो, त्यावेळीच ठरवलेलं की आयुष्यात एकदा तरी आमदार व्हायचं.
संघर्षातून सारे मिळवले…
लाड म्हणाले, त्याकाळी बाबुराव भापसे यांची मुलगी मुंबईतून पळवून नेऊन लग्न करणं ही खूप मोठी गोष्ट होती. खिशात पैसे नव्हते. मग मी मेहनत करायला सुरुवात केली. टाईम्स ऑफ इंडियात मी हमाली करायचो. त्याचे 70 रुपये मला मिळायचे. त्यापैकी 40 रुपये बायकोला द्यायचो आणि 30 रुपयांनी विद्यार्थी काळातलं राजकारण करायचो. अशाप्रकारे संघर्षातून सगळं मिळवलं. पुढे राजकारणात सक्रिय झाले. शरद पवार, अजित पवार आणि छगन भुजबळ यांनी जी संधी दिली, त्या संधीचं मी सोनं केलं, असं म्हणत त्यांचेही त्यांनी आभार मानले.
इतर बातम्याः
नाशिकच्या म्हाडा घोटाळ्यात जाधव बळीचा बकरा; एकूण 9 महापालिका आयुक्त अन् म्हाडाच्या अधिकाऱ्यांना अभय