अनिल देशमुख यांच्या जामिनानंतर शरद पवार अॅक्शन मोडवर, आता पुढची रणनीती काय? म्हणाले….
अनिल देशमुखांच्या जामिनावर शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपली पुढची रणनीती सांगून टाकली.
रणजित जाधव, पुणे : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज तब्बल 13 महिन्यांनी जामीन मिळाला. त्यामुळे त्यांची आज जेलमधून सुटका झाली. अनिल देशमुखांच्या जामिनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. आपल्या सहकाऱ्यांना खूप यातना सोसाव्या लागल्या. अशा प्रकारच्या यातना आणखी कुणावर सोसण्याची वेळ येऊ नये यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार असल्याची प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
“सत्तेचा वापर कसा होतो त्याचं हे उदाहरण आहे. अनिल देशमुख यांच्याबरोबर इतर कुणावर अत्याचार होऊ नये यासाठी गरज पडल्यास मोदींची भेट घेऊ”, अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली.
“मी आणि संसदेचे काही सीनियर सहकारी गृहमंत्री आणि शक्य झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलणार आहोत. आमच्या काही सहकाऱ्यांना यातना सोसाव्या लागल्या. इतरांवर ही स्थिती येऊ नये यासाठी हा प्रयत्न आहे”, असं पवार म्हणाले.
“मनी लॉन्ड्रिंगच्या कायद्यावर रिव्ह्यू घ्यावा, अशी मागणी होतेय. पण आम्ही मागणी नाही करत आहोत. आम्ही संसदेत आहोत. त्यामुळे संसदेतील आणखी काही सहकाऱ्यांना घेऊन त्यासंबंधी काही योजना आणता येईल, तसा प्रयत्न तिकडे करायचा आहे. त्या कामाला आम्ही सुरुवात केलीय”, अशी माहिती शरद पवार यांनी दिली.