पवारांनी राऊतांकडे माइक देताच भाजप आमदारांचे बिनसले; स्नेहभोजनातून तडक रावसाहेब दानवेंच्या द्वारी!!
संजय राऊतांकडे ईडीचे पाहुणे येऊन गेले, अशी गुगली स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात शरद पवारांनी टाकली. अन् बोलण्यासाठी माइक संजय राऊतांकडे सोपवला. मात्र, या त्याच क्षणी भाजपच्या आमदारांचे बिनसले आणि त्यांनी या कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

नवी दिल्लीः राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष आणि मुरब्बी राजकारणी म्हणून देशभरात ओळख असणारे शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल नवी दिल्लीत आयोजित केलेल्या स्नेहभोजनाच्या चर्चा आजही झडतायत. या छोट्याशा पण बातमीच्या दृष्टीने महत्त्वाच्या ठरलेल्या कार्यक्रमात पवारांनी बोलण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याकडे माइक दिला. त्याचेच निमित्त झाले आणि यावेळी उपस्थित असलेल्या भाजपच्या आमदारांचे बिनसले. त्यांनी भर कार्यक्रमातून काढता पाय घेतल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही उपस्थित होते. खरे तर भाजप आणि ईडीच्या विरोधात रणशिंग फुंकून त्यांना थेट अंगावर घेण्याचे काम संजय राऊतांनी आतापर्यंत केले आहे. त्याच्या पुढच्या अध्यायात कालच संजय राऊत यांच्या मालमत्तेवर ईडीने टाच आणल्याचे समोर आले. त्यानंतर रंगलेल्या या स्नेहभोजनातील नाना छटांचे राजकीय रंग आता महाराष्ट्रासमोर येत आहेत. त्याचेही नाना तर्कवितर्क लावणेही सुरू आहे.
त्याचे झाले असे…
नवी दिल्लीत आमदारांचा एक प्रशिक्षण वर्ग सुरू होता. या वर्गासाठी सर्वपक्षीय आमदारांनी हजेरी लावली होती. हे निमित्त साधून शरद पवारांनी या आमदारांसाठी आपल्या घरी स्नेहभोजनाच्या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवसेना खासदार संजय राऊतही उपस्थित होते. मात्र, आमदारांमध्ये बुहतांश राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेने आमदारांची संख्या जास्त होती. तर भाजप आमदारांची संख्या जवळपास 16 असल्याचे समोर येत आहे.
पवारांचा बाण सुटला…
स्नेहभोजनापूर्वी सकाळीच शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या संपत्तीवर ईडीने टाच आणली होती. पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ही कारवाई केल्याचे ईडीचे म्हणणे आहे. या प्रकरणाचे पडसाद यावेळी उमटले. शरद पवारांनी आपल्या बोलण्यात या कारवाईचा उल्लेख केला. संजय राऊतांकडे सकाळीच ईडीचे पाहुणे येऊन गेले, अशी गुगली यावेळी पवारांनी टाकली. अन् बोलण्यासाठी माइक राऊतांकडे सोपवला. मात्र, या त्याच क्षणी भाजपच्या आमदारांनी या कार्यक्रमातून काढता पाय घेतला.
थेट रावसाहेबांकडे पोचले…
पवारांच्या स्नेहभोजनातून काढता पाय घेतलेले भाजपचे सोळा आमदार थेट केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि सुनील शेळके सुद्धा दानवेंच्या घरी धडकले. हा कार्यक्रमही पूर्वनियोजित होता असे सांगण्यात येत आहे. मात्र, हे खरे की, हा निव्वळ योगायोग अशीही चर्चा सुरूय. ती आता होतच राहणार.