BREAKING : महाविकास आघाडीच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, स्नेह भोजनाच्या कार्यक्रमानंतर बैठकीत काय खलबतं?
आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजपला चितपट करण्यासाठी महाविकास आघाडीकडून रणनीती आखली जात आहे. विशेष म्हणजे मुंबईत आज मविआच्या सर्वच दिग्गज नेत्यांची अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली.
मुंबई : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) गोटात सध्या प्रचंड वेगाने हालचाली घडत आहेत. कसबा (Kasba) पोटनिवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला जणू उभारीच आली आहे. आगामी सर्व निवडणुकांमध्ये भाजपला चितपट करण्यासाठी महाविकास आघाडीकडून रणनीती आखली जात आहे. विशेष म्हणजे मुंबईत आज मविआच्या सर्वच दिग्गज नेत्यांची अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), आणि काँग्रेसचे दिग्गज नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्यापासून अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय खलबतं झाली, याबाबतची इनसाईट स्टोरी ‘टीव्ही 9 मराठी’च्या हाती लागली आहे.
महाविकास आघाडीचे नेते अधिवेशनानंतर दौरे करणार आहेत. याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. तसेच यापुढच्या काळात एकी राहणार यावर बैठकीत एकमत झालं. सगळ्यांनी एकत्रित येऊन काम करा, असा मोलाचा सल्ला शरद पवारांनी यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व आमदार आणि नेत्यांना दिला.
शरद पवार नेमकं काय म्हणाले?
शरद पवारांनी शिवसेना पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली. काँग्रेसच्या काळात चिन्ह गोठवलं होतं. मात्र यावेळी निवडणूक आयोगानं निर्णय वेगळा दिला, असं मत शरद पवारांनी मांडल्याची माहिती समोर आलीय. कसब्याची 30 वर्षांची जागा येऊ शकते. त्यामुळे राज्यात बदल होणार, असं मत महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मांडलं. सर्व नेत्यांनी आजच्या निकालाचं कौतुक केलं.
खरंतर ही बैठक राष्ट्रवादीच्या पुढाकाराने घेण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आज महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांसाठी स्नेह भोजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. यावेळी ही महत्त्वाची बैठक पार पडली. मुंबईत सीसीआय क्लबच्या सी.के.नायडू बॅन्क्वेट हॉलमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पार्टीच्या नेत्यांची उपस्थिती लावली.
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्षनेते अजित पवार, अंबादास दानवे, नाना पटोले, आमदार जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, सचिन अहिर, राजन साळवी, नितीन देशमुख, रामराजे निंबाळकर, अबू आझमी, भास्कर जाधव आणि रोहित पवार, नितीन राऊत, मनिषा कायंदे, राजेश टोपे अशा अनेक दिग्गजांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
दरम्यान, या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “अधिवेशन सुरू आहे आणि त्याच दरम्यान आज कसबा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजय मिळाला. एकंदर या सर्व विषयांना संदर्भात चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडी मधील सर्व पक्ष आणि त्यांचे प्रमुख नेते या बैठकीत उपस्थित होते”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.